पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच
By admin | Published: July 17, 2016 12:37 AM2016-07-17T00:37:41+5:302016-07-17T00:37:41+5:30
मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्यात भाजपा-शिवसेनेमध्ये पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
भाजपाला हवे यवतमाळ : शिवसेनेचा आग्रह नांदेडसाठी
यवतमाळ : मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्यात भाजपा-शिवसेनेमध्ये पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपाला कोणत्याही परिस्थितीत यवतमाळचे पालकमंत्रीपद हवे आहे. शिवसेनेपुढे वाशिमचा पर्याय ठेवण्यात आला असला तरी सेनेने नांदेड या मोठ्या जिल्ह्यासाठी आग्रह धरला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात मदन येरावार यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. त्यांच्याकडे ऊर्जा, बांधकाम, सामान्य प्रशासन, पर्यटन या सारखे महत्वाचे खाते दिले गेले. मुळात त्यांना कॅबिनेट दिले जाणार होते. परंतु जानकर यांनी अखेरपर्यंत कॅबिनेटचा हट्ट न सोडल्याने येरावारांचे कॅबिनेट त्यांना देण्यात आले. येरावारांना राज्यमंत्रीपद दिले असले तरी त्यांच्याकडे हेवीवेट खाते देऊन त्यांना कॅबिनेट न दिली गेल्याची कसर दूर करण्यात आली. आता राहिलेली कसर ही येरावार यांना यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊन दूर केली जावी, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. जिल्ह्यात भाजपाचे सात पैकी पाच आमदार असल्याने येथील पालकमंत्रीपद भाजपाकडेच रहावे, ही पक्षाची मागणी आहे. जिल्ह्याचे पालकत्व येरावारांनाच मिळणार असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. तर इकडे शिवसेनेने आपले पालकमंत्रीपद जाऊ नये म्हणून मोर्चेबांधणी चालविली आहे. राजकीय गॉडफादर व सीएमओ कार्यालयामार्फत हे प्रयत्न सुरू असले तरी त्यात सेनेला कितपत यश येते याकडे नजरा लागल्या आहेत. यवतमाळचे पालकमंत्रीपद गेल्यास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे शेजारील वाशिम जिल्ह्याची जबाबदारी दिली जाणार असल्याची राजकीय गोटातील माहिती आहे. परंतु राठोड यांना वाशिम कोणत्याही परिस्थितीत नको आहे. त्याऐवजी त्यांनी राजकीयदृष्ट्या वजनदार व भौगोलिक दृष्टीने मोठ्या असलेल्या नांदेड जिल्ह्याचा पर्याय पुढे केला आहे. नांदेड हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांचा गृहजिल्हा आहे. त्यामुळे संजय राठोड यांना नांदेडमध्ये पाठवून काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना पाहण्याची भाजपातील अनेकांची मनिषा आहे. इकडे संजय राठोड यांच्याकडे वाशिमची जबाबदारी आल्यास ते लोकसभेच्या दृष्टीने बांधणी करण्याची व तेथे त्यांचा वेगळा गट तयार होण्याची हूरहूर सेनेतील एका गटात पाहायला मिळते. एकूणच पालकमंत्री पदाच्या मदन येरावार व संजय राठोड यांच्यातील स्पर्धेत नेमके कोण विजयी होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
रस्ते-इमारतींसाठी भाजपाचा जोर
ना.मदन येरावार यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची जबाबदारी आहे. मुळात भाजपाला येरावारांकडे सार्वजनिक बांधकाममधील रस्ते व इमारती हे खाते मिळणे अपेक्षित होते. रस्ते महामंडळ मिळाल्याने येरावार समर्थकांमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. म्हणूनच रस्ते व इमारती हे बांधकाम खाते यवतमाळकडे खेचता येऊ शकते का या दृष्टीने भाजपा चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. सध्या हे खाते अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे आहे. पोटेंकडील बांधकामची जबाबदारी येरावारांकडे तर येरावारांकडील बांधकाम पोटेंकडे जाणार असल्याची चर्चा अमरावतीच्या मुख्य अभियंता कार्यालयात ऐकायला मिळाली.