पालकमंत्र्यांच्या घरावर रुग्णवाहिकांसह दिली धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 09:30 PM2019-02-07T21:30:10+5:302019-02-07T21:31:22+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारातून रुग्णवाहिकांना बाहेर काढण्याचा निर्णय पालकमंत्री मदन येरावार यांच्या आदेशावरून भाजपा आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्त्वातील अभ्यागत मंडळाने नुकताच घेतला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारातून रुग्णवाहिकांना बाहेर काढण्याचा निर्णय पालकमंत्री मदन येरावार यांच्या आदेशावरून भाजपा आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्त्वातील अभ्यागत मंडळाने नुकताच घेतला होता. या निर्णयाच्या निषेधार्थ गुरुवारी महाविद्यालयातील सर्व रुग्णवाहिका घेऊन चालक पालकमंत्री मदन येरावार यांच्या दत्तचौक स्थित निवासस्थानावर धडकले. यावेळी शहराचे हृदयस्थळ असलेल्या दत्त चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर आम्हाला काढण्याऐवजी तेथे पर्यायी रुग्णवाहिका मोठ्या संख्येने उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी या रुग्णवाहिकांच्या आंदोलकांनी केली आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशावरून बाहेर काढले जात असल्याने जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरावर रुग्णवाहिकांसह धडक दिल्याचेही आंदोलकांनी स्पष्ट केले. अभ्यागत मंडळाचे सदस्य तथा यवतमाळ नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रा. प्रवीण प्रजापती यांनी या रुग्णवाहिका रुग्णांना लुटत असल्याचा आरोप मंडळाच्या बैठकीत केला होता. नागपुरातील एक डॉक्टर या रुग्णवाहिका चालकांना मॅनेज करतो, म्हणून या रुग्णवाहिका रुग्णांना त्याच डॉक्टरच्या दवाखान्यात भरती करतात, असा आरोप प्रजापती यांनी केला होता. त्यावरूनच या रुग्णवाहिका महाविद्यालयाच्या बाहेर काढण्याचा निर्णय अभ्यागत मंडळाने घेतला होता. गुरुवारी पालकमंत्र्यांच्या घरावर अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
यावेळी रुग्णवाहिका चालक मालक संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम कामठे, उपाध्यक्ष संतोष मेश्राम, सचिव मनोज लुटे, बिपीन चौधरी, संतोष मेश्राम, सागर राऊत, चंदन नित, मोहन कामठे, राजू गोफने उपस्थित होते.
या आंदोलनादरम्यान रुग्णवाहिकांच्या रांगा लागल्याने दत्त चौकातील वाहतूक बराचवेळ विस्कळीत झाली होती. पालकमंत्र्यांच्या घरापुढे वातावरण चांगलेच तापले होते. मात्र पोलिसांनी पुढाकार घेऊन काही वेळानंतर वाहतूक सुरळीत केली.
रुग्णाला आंदोलनाचा फटका
रुग्णवाहिका चालकांच्या आंदोलनाचा फटका रुग्णाला बसला. बरबडा येथील सुलोचना राठोड यांना उपचारासाठी वर्ध्याला नेले जाणार होते. मात्र आंदोलनामुळे त्यांचा अर्धा तास खोळंबा झाला. यानंतर रुग्णवाहिका रुग्णाच्या उपचाराकरिता नियोजीत दवाखान्याकडे रवाना झाली.
...तर रुग्णवाहिका गावाबाहेर जाणार नाही
रुग्णवाहिका चालकांच्या प्रश्नावर योग्य निर्णय न झाल्यास बहिष्कार आंदोलन कायम राहणार आहे. यामुळे अपघात, मृत्यू अथवा कुठल्याही घटनेत रुग्णाला बाहेरगावी नेले जाणार नाही, असा इशारा संघटनेने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.