पालकमंत्र्यांचे अल्टिमेटम फुसकेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 05:00 AM2022-04-06T05:00:00+5:302022-04-06T05:00:46+5:30

योजनेच्या कामासाठी खराब केलेले रस्ते चांगले करून मिळावे, यासाठी नगरपरिषदेने जीवन प्राधिकरणाला वारंवार पत्र दिले. रस्त्याची दुरुस्ती, तर दूर कामासाठीचा खर्चही दिला नाही. एकूण १२ कोटींची मागणी प्राधिकरणाकडे करण्यात आली. त्यातील एक पैसाही दिला नाही. त्यामुळे योजनेपोटी मजिप्राला द्यावयाचे ११ कोटी ५६ लाख रुपये थांबविण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी दिली. मेडिकल चौक ते मेडिकल कॉलेज प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी प्राधिकरणाला सूचना केल्या.

Guardian's ultimatum fussed | पालकमंत्र्यांचे अल्टिमेटम फुसकेच

पालकमंत्र्यांचे अल्टिमेटम फुसकेच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बेंबळा प्रकल्पावरून यवतमाळ शहराकरिता पिण्याचे पाणी आणण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या अमृत योजनेने शहरवासीयांना हैराण करून सोडले आहे. जागोजागी होत असलेले खोदकाम नागरिकांच्या जिवावर उठले आहे. योजना तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी यवतमाळच्या पालकमंत्र्यांनी कंत्राटदाराला दिलेले तीन अल्टिमेटमही फुसका बार ठरले आहे. या कंत्राटदाराच्या डोक्यावर कोणाचा हात आहे, असा संतप्त प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 
एप्रिल २०१७ मध्ये या योजनेच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. अडीच वर्षांत ही योजना पूर्ण करायची होती. पाच वर्षांचा कालावधी लोटूनही योजना  अपूर्णच आहे, काम अंतिम टप्प्यात आहे, एवढेच उत्तर यंत्रणेकडून दिले जात आहे. 
योजनेच्या कामामुळे लोकांना त्रास  होत आहेत. हा विषय पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी हाती घेतला. प्रत्येक दौऱ्यावेळी त्यांनी या योजनेचा आढावा घेतला. कंत्राटदाराला अल्टिमेटम देण्यात आला. असा प्रकार तीनवेळा घडला. शेवटच्या ऑगस्ट महिन्यातील अल्टिमेटमनंतर सात महिन्यांचा कालावधी लोटला. तरीही योजना पूर्णत्वास जाण्याची चिन्हे नाहीत. आता पालकमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
योजनेच्या कामासाठी शहरभर पाईपलाईनचे जाळे पसरविण्यात आले आहे. जागोजागी लिकेज निघत आहे. ही तपासणी करण्यासाठी अवाढव्य खड्डे खोदण्यात येत आहेत. अशाच एका प्रकारात येथील चर्च रोडवर पाण्यात बुडून एका व्यक्तीचा  ६ सप्टेंबर २०२१ रोजी मृत्यू  झाला. त्याची चौकशी यवतमाळचे उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी मजिप्राचे अधिकारी, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी, कंत्राटदार यांचे बयाण नोंदवून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविला. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले आहे.  

नगरपरिषदेने ११ कोटी थांबविले 
- योजनेच्या कामासाठी खराब केलेले रस्ते चांगले करून मिळावे, यासाठी नगरपरिषदेने जीवन प्राधिकरणाला वारंवार पत्र दिले. रस्त्याची दुरुस्ती, तर दूर कामासाठीचा खर्चही दिला नाही. एकूण १२ कोटींची मागणी प्राधिकरणाकडे करण्यात आली. त्यातील एक पैसाही दिला नाही. त्यामुळे योजनेपोटी मजिप्राला द्यावयाचे ११ कोटी ५६ लाख रुपये थांबविण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी दिली. मेडिकल चौक ते मेडिकल कॉलेज प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी प्राधिकरणाला सूचना केल्या. अखेर हे काम जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेल्या रकमेतून केले जात असल्याचे त्या म्हणाल्या.

 रस्त्यावरून चालायचे कसे? या ठिकाणी होतो त्रास
- वीर वामनराव चौकात काॅंक्रीट टाकून ठेवले. 
- शिवाजी गार्डनजवळ खड्ड्यात फक्त माती टाकली
- एसटी कार्यशाळेजवळचा खड्ड्याहून सहा महिने लोटले 
- पळसवाडी वसाहतीच्या नवीन रस्त्याची चाळणी केली. 
- मेडिकल काॅलेज चौकात मातीच्या ढिगाऱ्याचे थडगे 
- वाघापूर बायपासवर लिकेजसाठी अवाढव्य खड्डा खोदला
- नवीन टाकलेल्या अंतर्गत पाईपलाईनमुळे भरवस्तीत झरे 

वाघापुरातील घटना गंभीर, मदतीचा हात द्या  
- वाघापूर येथे टेकडीवर संतुलन टाकी (एमबीआर) बांधण्यात आली आहे. त्या ठिकाणी टेस्टिंग करताना सटकलेल्या पाईपने वाघापुरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. घरातून पुरासारखे पाणी वाहून गेले. या घटनेचा टेकडीखाली वास्तव्य असलेल्या १४ कुटुंबाला फटका बसला. याची भरपाई कंत्राटदाराने द्यावी, अशी रास्त मागणी होत आहे.  

अमृत योजनेसंदर्भात मजिप्रा अधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक घेतली जाते. सध्या दोन झोनचे काम पूर्ण झाले आहे. योजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाघापूर टेकडी येथील घटनेची चौकशी करून अहवाल मागविला आहे. या प्रकरणात लोकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कंत्राटदाराने द्यावी, अशा सूचना केली आहे. शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी पुन्हा मजिप्राला सांगितले जाईल. 
- अमोल येडगे, जिल्हाधिकारी,

अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. काही महिन्यातच पूर्ण होईल. या कामासाठी खोदलेले रस्ते बुजविण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. मात्र डांबरीकरणाची कंत्राटात तरतूद नाही. त्यामुळे या कामासाठीच्या खर्चाचा हिशेब पालिकेला मागितला आहे. त्यानुसार रक्कम दिली जाईल. वाघापूर येथे नुकसान झालेल्या लोकांना वस्तू रुपात मदत करण्यात आली. त्यांची घरे धुवून स्वच्छ करून दिली. 
- निखिल कवठळकर
उपविभागीय अभियंता,मजीप्रा.

 

Web Title: Guardian's ultimatum fussed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.