गुरूजी, शाळा बंद...तुर्त गाव सांभाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 05:32 PM2020-09-01T17:32:35+5:302020-09-01T17:32:43+5:30
झेडपीचे फर्मान : यवतमाळातील ११८ ग्रामपंचायतींवर मुख्याध्यापक झाले प्रशासक
यवतमाळ : कोरोनामुळे खेड्यापाड्यातील शाळा बंदच असून गुरूजी या कंटाळवाण्या सुटीत घरगुती कामांत मश्गूल आहेत. मात्र आता शिक्षकांच्या या मोकळ्या वेळेचा उपयोग गावाच्या कारभारासाठी करून घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील ११८ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून मुख्याध्यापकांची नेमणूक करण्यात आली असून जिल्हा परिषदेने सोमवारी सायंकाळी आदेश निर्गमित केले.
आॅगस्टमध्ये जिल्ह्यातील १५९ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत संपली. मात्र कोरोना संकटामुळे तेथे लगेच निवडणूक शक्य नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रशासक नेमण्यासाठी त्या-त्या पंचायत समिती स्तरावरही पुरेसा कर्मचारीवर्ग नाही. अखेर संबंधित गावातीलच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला ग्रामपंचायतीची सूत्रे सोपविण्याचा निर्णय सीईओ डाॅ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी घेतला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या असून मुख्याध्यापकांना तत्काळ ग्रामपंचायतीची सूत्रे स्वीकारून तसा अहवाल गटविकास अधिकारी यांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयाने शिक्षक वर्तृळात 'कही खुशी कही गम' स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अतिरिक्त जबाबदारी शिरावर लादल्याबद्दल कुठे कुरबूर व्यक्त होत आहे, तर कुठे ग्रामपंच्यायतीच्या माध्यमातून शाळेला उर्जितावस्था मिळवून देण्याची खुमखुमी व्यक्त होत आहे.
मात्र या मुख्याध्यापकांना अधिनियमाला अनुसरूनच गावाचा कारभार करावा लागणार आहे. शिवाय ग्रामपंचायतींच्या कामकाजात त्यांना मताधिकार नसेल. कारभारात गैरवर्तणूक आढळल्यास प्रशासकपद रद्द होण्यासोबतच 'गुरू' म्हणून गावाने दिलेल्या इभ्रतीला धक्का पोहोचण्याचा धोका आहे.
बाॅक्स
या गावांचे हेडमास्तर कारभारी
पांढरकवडा तालुका :
लिंगटी, तेलंग टाकळी, करणवाडी, वागदा, दहेली तांडा, बोरगाव, आकोली खु., वाठोडा.
उमरखेड तालुका :
बाळदी, बोथा वन, चालगणी, डोंगरगाव, खरूस बु., कोपरा खु., कुपटी, लिंबगव्हाण, सोईट घ., सुकळी न., उंचवडद.
आर्णी तालुका :
दाभडी, सुकळी, शिरपूर, येरमल हेटी, पहूर नस्करी, पांढुर्णा.
कळंब तालुका :
शरद, मेटीखेडा, शिवणी, कामठवाडा, चापर्डा, खैरी, पोटगव्हाण, प्रधानबोरी, नांझा, किन्हाळा, देवनळा, वटबोरी, कात्री, बेलोरी, कोळझरी, गणेशवाडी, रूढा, मानकापूर, माटेगाव.
बाभूळगाव तालुका :
यरंडगाव, खर्डा, फाळेगाव, सरूळ, महंमदपूर, नांदुरा बु., टाकळगाव, मानकापूर दे., कोटंबा, मादणी, करळगाव, गळव्हा, आलेगाव, आसेगावदेवी, दाभा, माहुली, नागरगाव, राणी अमरावती.
राळेगाव तालुका :
आंजी, वाढोणाबाजार, आष्टोणा, धुम्मकचा, करंजी, भांब, वेडशी, बोरी ई., खडकी, किन्ही ज., पिंपळापूर, मेगापूर, पिंप्री सा., रिधोरा, झुल्लर.
दारव्हा तालुका :
ब्रह्मी, वारजई, चाणी, मोझर ई., धुळापूर, शेलोडी, चिकणी, किन्ही वळगी, खेड, कु-हाड बु., कु-हाड खु., धामणगावदेव, तोरनाळा, बोथ, टाकळी बु., सायखेडा, गणेशपूर, शेंद्री बु., पाळोदी, वागद बु., ब्रह्मनाथ, डोल्हारी घना, मानकोपरा, नखेगाव, वरुड, भुलाई, खोपडी, तरोडा, बानायत, सावळा, कोलवाई.
मारेगाव तालुका :
आकापूर, कोलगाव, मांगरुळ, टाकरखेडा, दांडेगाव, आपटी, करणवाडी, हिवरा मजरा, टाकळी, इंदिराग्राम.
४१ गावात वेगळे प्रशासक
११८ गावात मुख्याध्यापक नेमले असले, तरी जादा लोकसंख्येच्या ४१ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, शाखा अभियंता आदींच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यात तरनोळी, महागाव कसबा, बोदेगाव, वडगाव गा., बोरी खु., देउरवाडी, वडकी, दहेगाव, विडूळ, साखरा, केळझरा को., खंडाळा, परसोडा, लोणी, पळशी, केळझरा वरठी, अंतरगाव, ईचोरा, दहेली, कवठाबाजार, पिंपरी बोरी, उमरी पोड, रूंझा, पाटणबोरी, कुंभा, पहूर, सावर, नायगाव, कोंढा, वाटखेड खु., मिटणापूर, सावंगीमांग, गणोरी, गिमोणा, कोपरा जा., पाचखेड, घारफळ, परसोडी, शेळी, पार्डी नकटी, जोडमोहा या गावांचा समावेश आहे.