१५ दिवसांची सुट्टी तरीही गुरुजी नाखूशच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 09:19 PM2018-11-03T21:19:32+5:302018-11-03T21:21:29+5:30
माणसाचे मन पाण्यासारखे असते. जिकडे उतार दिसला तिकडे धावत जाते... इतर कुणाच्या बाबतीत असो किंवा नसो, पण झेडपी गुरुजींचे मन पाण्याहूनही चपळ नव्हे चंचल आहे. कितीही मिळाले तरी आणखी हवेच, हा हव्यास काही सुटत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : माणसाचे मन पाण्यासारखे असते. जिकडे उतार दिसला तिकडे धावत जाते... इतर कुणाच्या बाबतीत असो किंवा नसो, पण झेडपी गुरुजींचे मन पाण्याहूनही चपळ नव्हे चंचल आहे. कितीही मिळाले तरी आणखी हवेच, हा हव्यास काही सुटत नाही. दिवाळीसाठी १३ दिवसांची घसघशीत सुटी मिळाल्यावरही गुरुजी आपले नाखूशच. १३ नव्हे आम्हाला १९ दिवसांची सुटी हवीच म्हणून जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवणे सुरू आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ५ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुटी जाहीर झाली आहे. त्यातही ४ तारखेचा आणि १८ तारखेचा रविवार आल्याने १५ दिवसांची दीर्घ सुटी मिळाली आहे. मात्र गुरुजीच ते, त्यांनी इतर जिल्हा परिषदांच्या तारखा शोधल्या आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर टाकल्या. वाशीम जिल्हा परिषदेने ५ ते २२ आणि अमरावती जिल्हा परिषदेने ५ ते १७ नोव्हेंबरपर्यंत शिक्षकांना सुट्या दिल्या आहेत. मग यवतमाळ जिल्हा परिषदेनेच सुट्या कमी का केल्या, असा सवाल शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारला आहे.
हो, दिवाळी सुट्यांच्या बाबतीत यवतमाळ जिल्हा परिषदेने अन्याय केला आहे. जिल्ह्यातील शिक्षकांना ५ ते २३ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुटी मिळावी, यासाठी आम्ही जिल्हा परिषदेत पाठपुरावा केला आहे.
- दिवाकर राऊत, जिल्हाध्यक्ष, इब्टा संघटना