गुरुजी, शाळेत शिकवा, शेती पिकवा अन् दहा हजार मिळवा; अनोखी स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 08:06 AM2023-01-08T08:06:35+5:302023-01-08T08:29:51+5:30
शालेय परसबागांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातील शाळांसाठी अनोखी स्पर्धा
- अविनाश साबापुरे
यवतमाळ : शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना आता अध्यापनासोबतच शाळेच्या परिसरात शेती पिकविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. शाळेच्या परिसरात परसबाग फुलवून तेथील भाजीपाला शालेय पोषण आहारामध्ये वापरला जावा, असा उद्देश ठेवून शासनाने राज्यभरातील शाळांसाठी परसबाग स्पर्धा घोषित केली आहे.
केंद्र शासनाने शालेय पोषण आहार योजनेला आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे नवे नाव दिले असून, योजनेत अनेक बदल सुचविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शाळेच्या परसबागेतील भाजीपाल्याचा विद्यार्थ्यांच्या आहारात समावेश केला जाणार आहे.
या परसबागेत भाजीपाला तसेच फळझाडांची लागवड करावी. त्यातील भाजीपाला व फळे विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वापरावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना ताजा भाजीपाला व फळे मिळाल्याने ते अधिक आनंदाने शालेय पोषण आहार सेवन करतील, असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी जिल्हा परिषदांना लेखी निर्देश देताना नमूद केले आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून स्पर्धा सुरू होतील.
असे आहे स्पर्धेचे स्वरूप
यात सर्वप्रथम केंद्र स्तरावरून उत्तम परसबागांची निवड केली जाणार असून, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तालुकास्तरीय परसबाग स्पर्धा होईल व जानेवारीच्या अखेरीस जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहे.
nयामध्ये तालुका स्तरावर प्रथम ५ हजार, द्वितीय ३ हजार व तृतीय २ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे, तर जिल्हा स्तरावर अनुक्रमे १० हजार, सात आणि पाच हजारांचे बक्षीस मिळविण्याची प्रत्येक शाळेला संधी आहे.
शेतकरी ठरवणार परसबागेची गुणवत्ता
या स्पर्धेत कोणत्या शाळेची परसबाग उत्तम आहे. याचा निर्णय घेण्यासाठी प्रगतिशील शेतकऱ्याच्या नेतृत्वात समिती नेमली जाणार आहे. त्यात शेतकऱ्यांसह अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी तसेच महिला बालविकास खात्याचे प्रतिनिधीही राहणार आहेत.
असे असतील निकष
स्पर्धेमध्ये १०० गुणांचे निकष तपासले जातील. परसबागेची रचना, हवामानानुसार भाज्यांची लागवड, देशी वाणांचा वापर, कमी पाणी लागणाऱ्या भाज्या, सिंचन पद्धत, सेंद्रिय परसबाग, विद्यार्थ्यांचा सहभाग आदी निकषांना गुण दिले जाणार आहेत.