सातवीच्या पुस्तकात येणार गुरुजींचे नाटक
By admin | Published: February 2, 2017 12:37 AM2017-02-02T00:37:52+5:302017-02-02T00:37:52+5:30
शालेय पाठ्यपुस्तके घडविणारी ‘बालभारती’ यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करताना राज्यातील शिक्षकांना लेखक होण्याची संधी देणार आहे.
नवा अभ्यासक्रम : बालभारतीकडून शिक्षकांना लेखक होण्याची संधी
अविनाश साबापुरे यवतमाळ
शालेय पाठ्यपुस्तके घडविणारी ‘बालभारती’ यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करताना राज्यातील शिक्षकांना लेखक होण्याची संधी देणार आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून शिक्षकांनी लिहिलेली एकांकिका पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याचा निर्णय पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने घेतला आहे.
पुढील सत्रात इयत्ता सातवी व नववीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यासाठी नवी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यात शिक्षकांनीच लिहिलेला एकांकिका हा नाट्यप्रकार समाविष्ट केला जाणार आहे. शालेय उपक्रमांच्या निमित्ताने अनेक शिक्षक नाट्य, काव्य लेखन करीत असतात. मात्र, ही साहित्यनिर्मिती केवळ एखाद्या कार्यक्रमापुरतीच मर्यादित राहते. आता यातील दर्जेदार साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट होणार असल्याने त्याचा लाभ राज्यभरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. शिवाय, शिक्षकांच्या सर्जनशीलतेलाही अधिक वाव मिळणार आहे.
सातवी ते नववीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांकडून बालभारतीने २७ जानेवारीपर्यंत एकांकिका मागविल्या आहेत. एका शिक्षकाला जास्तीत जास्त तीन एकांकिका पीडीएफ फॉर्मेटमध्ये बालभारतीकडे ई-मेल करता येईल. विशेष म्हणजे, मराठी, इंग्रजी, हिंदी यापैकी कोणत्याही भाषेतील एकांकिका स्वीकारली जाणार आहे. एकांकिकेचा विषय विद्यार्थ्यांच्या वयोगटाला अनुरूप असावा, एवढीच अट आहे.
शिवाय, संबंधित एकांकिका आपण लिहिलेली असल्याबाबत शिक्षकांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. राज्यभरातून आलेल्या एकांकिकांपैकी उत्तम ठरणाऱ्या साहित्यकृतींचा सातवी आणि नववीच्या पाठ्यपुस्तकात समावेश केला जाणार आहे.