ढाणकी येथे कोविड सेंटर उभारणीसाठी गुरुजींचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:44 AM2021-05-07T04:44:16+5:302021-05-07T04:44:16+5:30
ढाणकी : येथे कोविड सेंटर उभारणीसाठी गुरुजींनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी तब्बल एक लाख रुपये गोळा केले ...
ढाणकी : येथे कोविड सेंटर उभारणीसाठी गुरुजींनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी तब्बल एक लाख रुपये गोळा केले आहे.
कोरोनाने ढाणकीसह परिसरात शिरकाव केल्याने अनेक नागरिक जीव गमावत आहे. अनेकांनी कोरोनाची धास्ती घेततली आहे. त्याकरिता येथे कोविड सेंटर उभी करण्याची संकल्पना शहर पत्रकार संघटनेने सोशल मीडियावर मांडली. त्यावरून अनेक दात्यांनी मदतीचा हात पुढे केला. शहराला ४० खेडी जोडली आहे. त्यामुळे शहरासह गावांमधील शिक्षकांनीही सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात पुढे केला.
भाउ राठोड, नारायण गारशेटवार आदींनी उमरखेड तालुक्यातील आपल्या सहकारी शिक्षक मित्रांना सोशल मीडियावर माहिती दिली. त्यांना मदतीचे आवाहन केले. सोशल मीडियावर ग्रुप करून त्याला शिक्षक कोविड सहायता असे नाव दिले. परिणामी कोरोना कक्ष उभारण्याकरिता १२६ शिक्षकांनी जमेल तेवढी मदत केली. यातून ९० हजार रुपये रुपये गोळा झाले. या पैशांतून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करून दिले जाईल, असे गुरुजींनी सांगितले.
बॉक्स
हवेतून ऑक्सिजन ओढणाऱ्या मशीन देणार
गोळा झालेल्या निधीतून येथील कोविड सेंटरसाठी हवेतून ऑक्सिजन ओढणाऱ्या दोन मशीन खरेदी केल्या जाणार आहे. यामुळे ढाणकी व परिसरातील नागरिक शिक्षकांच्या कामाचे कौतुक करीत आहेत. विशेष म्हणजे जीव धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्याचे मोजमाप घेण्याचे काम करूनसुद्धा शिक्षकांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्याकडे दुर्लक्ष करून गुरुजींनी तालुक्यातील जनतेसाठी आर्थिक मदत केल्याचे आनंद कुबरवार यांनी सांगितले.