शाळा, महाविद्यालयाजवळ गुटखा विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:02 PM2018-06-25T22:02:02+5:302018-06-25T22:02:41+5:30
राज्यात सर्वत्र गुटखा बंदी असली तरी प्रत्यक्षात ती कागदावरच असल्याचे पहायला मिळते. कारण कोणत्याही शाळा-महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावर पानटपऱ्यांमधून सर्रास प्रतिबंधित गुटख्याची विक्री होतानाचे चित्र दृष्टीस पडते आहे. ही गुटखा विक्री रोखण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासनावर असली तरी समाजातील लोकप्रतिनिधी, प्रशासन, शिक्षक, पालक, सामाजिक संस्था, शाळा व्यवस्थापन आदी सर्वच घटकांचे ते अपयश मानले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यात सर्वत्र गुटखा बंदी असली तरी प्रत्यक्षात ती कागदावरच असल्याचे पहायला मिळते. कारण कोणत्याही शाळा-महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावर पानटपऱ्यांमधून सर्रास प्रतिबंधित गुटख्याची विक्री होतानाचे चित्र दृष्टीस पडते आहे. ही गुटखा विक्री रोखण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासनावर असली तरी समाजातील लोकप्रतिनिधी, प्रशासन, शिक्षक, पालक, सामाजिक संस्था, शाळा व्यवस्थापन आदी सर्वच घटकांचे ते अपयश मानले जाते.
मंगळवार २६ जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर यवतमाळ शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अंमली पदार्थाच्या स्थितीचा, व्यसनाधिनतेवर नजर टाकली असता धक्कादायक व तेवढेच धोकादायक चित्र पुढे आले आहे. शाळा-महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी गुटखा, तंबाखूच्या आहारी गेले आहेत. बंदी असली तरी त्यांना हा गुटखा आपल्या शाळा-महाविद्यालयाच्या परिसरातील काही पानटपºयांवरून सहज उपलब्ध होतो आहे. या पानटपºयांवर प्रतिबंधित गुटख्याची साठेबाजी केली जाते. अगदी प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थीसुद्धा गुटख्याच्या गर्तेत अडकले आहे. एवढेच काय या गुटख्यावर नियंत्रण ठेवण्याची कायद्याने जबाबदारी असलेल्या अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या शिवाजी गार्डन रोडवरील कार्यालयाच्या २०० मीटर परिसरातच गुटख्याची विक्री होताना दिसते.
गुटखा बंदी ही कागदावरच असल्याचे चित्र सर्वदूर आहे. गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट चालविले जाते. लगतच्या तेलंगणा, आंध्रातून येणारा हा गुटखा सर्वदूर विशिष्ट साखळीतून पोहोचविला जातो. त्याचे गोदाम, ठोक विक्रेते, चिल्लर विक्रेते असे सारेच घटक सर्वांनाच माहीत आहे. मात्र कारवाईची कुणाची तयारी नाही. कारण या व्यवसायातील लाभाचे संबंधित सर्वच घटक भागीदार आहेत. गुटख्याच्या वाहनांना क्वचित प्रसंगी पोलीस आडवे होत असले तरी बहुतांश वेळी ‘आम्हाला कारवाईचे अधिकार नाही’ असे सांगून ते एफडीएकडे बोट दाखवित मोकळे होतात. ‘लाभ’ घेताना मात्र त्यांचा क्रमांक सर्वात पहिला लागतो. एफडीए मात्र आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, हे ठेवणीतील कारण पुढे करून सातत्याने स्वत:चा बचाव करताना दिसते. एखादवेळी ‘तडजोडी’ फिस्कटल्याने गुटख्याचा ट्रक पकडला गेल्यास त्याची व्यापक प्रसिद्धी करून घेण्यात पोलीस व एफडीएची यंत्रणा कधीच मागे नसते. जणू त्यांच्या या एका धाडीने गुटखा तस्करी मुळासकट संपलीच असे चित्र उभे केले जाते. शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात, चौका-चौकात दिसणाºया प्रतिबंधित गुटख्याच्या रिकाम्या पुड्या हे या गुटखा तस्करी व विक्रीचे भक्कम पुरावे ठरत आहे.
विद्यार्थी व तरुणाई केवळ गुटख्याच्याच आहारी गेलेली नसून गांजा, ब्राऊन शुगर, अफीम या सारख्या अंमली पदार्थांनीही त्यांना विळखा घातला आहे. प्रतिष्ठीत नेते मंडळींची बिघडलेली मुले तर चलनी नोटांमध्ये गांजा-ब्राऊन शुगर टाकून सार्वजनिक ठिकाणी ती ओढत असल्याचे चित्र कित्येकांनी पाहिले आहे. शहराच्या काही भागात हे अंमली पदार्थ सहज उपलब्ध होतात. गेल्या कित्येक वर्षात पोलिसांनी गांजा, अफीम, ब्राऊन शुगर विक्रेत्यावर कारवाई केल्याची नोंद नाही. यापूर्वी अलिकडे काही पिणाºयांना तेवढे ताब्यात घेण्यात आले होते. तेलंगणा-आंध्रप्रदेशातून विविध माध्यमातून गांजा तस्करी केली जाते. पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा गांजा यवतमाळ जिल्हा मार्गे विदर्भात विविध ठिकाणी पाठविला जातो. हे अंमली पदार्थ पोलिसांसाठी आव्हान ठरले आहे. गांजाच्या आहारी केवळ तरुणाईच गेलेली नसून विविध वयोगटातील व्यक्तींनासुद्धा गांजाने विळखा घातला आहे. दारू हासुद्धा अंमली पदार्थातील महत्वाचा घटक आहे. ही दारू केव्हाही व कुठेही जिल्ह्यात उपलब्ध होते. एवढेच नव्हे तर बंदी असलेल्या लगतच्या वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा यवतमाळातूनच दारूचा पुरवठा केला जातो. परवानाप्राप्त दारू कमी पडते म्हणून की काय अनेक गावात भट्ट्या लावून गावठी दारूची निर्मिती केली जाते व ती सर्वत्र कमी पैशात उपलब्ध करून दिली जाते.
पालकच मुलांसमोर खातात खर्रा
शाळेमध्ये तंबाखू, गुटखा, खर्रा खाऊ नये, अशी सूचना देऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येते. मात्र त्यानंतरही काही विद्यार्थी खर्रा खाताना आढळून आले. त्यांना समज देण्यासाठी पालकांना शाळेत बोलाविण्यात आले. तर त्यातील काही पालकांच्या तोंडातही खर्रा होता. काही पालक तर मुलांनाच खर्रा आणायला सांगतात. तंबाखू व नशेच्या आहारी मुलांनी जाऊ नयेसाठी पालकांनी सजग रहायला हवे. आपणच व्यसन केले तर मुलांवर त्याचा वाईट परिणाम होतो. पालकांनी व्यसनांपासून दूर रहावे.
- मोहन केळापुरे, मुख्याध्यापक विवेकानंद विद्यालय, यवतमाळ.
‘डॉन’च्या भीतीने ‘एफडीए’च्या नांग्या
एफडीएचे येथील सहायक आयुक्त जयंत वाणे यांनी अपेक्षेनुसार व नेहमी प्रमाणे मनुष्यबळाचे कारण पुढे केले. आम्ही चारच लोक आहोत, त्यात एवढ्या मोठ्या जिल्ह्यावर नजर ठेवणार कशी असा उलट सवाल वाणे यांनी उपस्थित केला. गुटखा तस्करीच्या या व्यवसायात आता व्यापारी उरले नसून सर्व सूत्रे गुन्हेगारी वर्तुळातील डॉनच्या हातात गेली आहेत. त्यामुळे पोलिसांशिवाय आम्हाला गुटख्यावर धाडी घालणे, कारवाई करणे शक्य नाही, असे सांगत वाणे यांनी एफडीएची हतबलता स्पष्ट केली.
शासनाने संपूर्ण राज्यभर गुटखा बंदी केली. त्यानंतरही गुटखा सहज मिळतो. अनेक विद्यार्थ्यांच्या दप्तरात गुटखा आढळला. आता शाळांमध्ये तंबाखू मुक्ती अभियान सुरू केले आहे.
- विवेक धर्माधिकारी
पर्यवेक्षक, अणे विद्यालय, यवतमाळ
नशाबंदी कुण्या एकट्याची जबाबदारी नाही. सर्वांनी मिळून पुढाकार घेतला पाहिजे. पालकांनीही याबाबत सजग राहून मुलांवर लक्ष दिले पाहिजे.
- प्राचार्य डॉ. प्रेरणा पुराणिक
बाबाजी दाते महाविद्यालय,यवतमाळ.