पुसदमध्ये शासकीय कार्यालयांच्या भिंतीवर गुटख्याच्या पिचकाऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:31 AM2021-07-17T04:31:22+5:302021-07-17T04:31:22+5:30
अखिलेश अग्रवाल पुसद : शहरातील विविध शासकीय कार्यालयांच्या भिंती गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या आहे. खर्रा खाऊन अनेक जण खुलेआम भिंतींवर ...
अखिलेश अग्रवाल
पुसद : शहरातील विविध शासकीय कार्यालयांच्या भिंती गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या आहे. खर्रा खाऊन अनेक जण खुलेआम भिंतींवर थुंकत आहे. यात कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त त्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचाही समावेश आहे.
‘भिंतीला कान असतात’ असे आपण नेहमीच ऐकत आलो. मात्र, खरेच भिंतीला बोलता आले असते तर, गुटखा खाऊन भिंतीवर थुंकणाऱ्यांना नक्कीच भिंतीची बोलणी खावी लागली असती. गुटखाबंदीमुळे भिंतींना तुच्छ लेखून थुंकणाऱ्याची संख्या कमी झाली नाही. अनेक बहाद्दर पान, खर्रा, गुटखा खाऊन भिंतीवर थुंकतात. भिंतीवर थुंकणाऱ्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे बहुतांश सार्वजनिक भिंतींना थुंकीने लाली चढविली आहे.
गुटखा, खर्रा, पान खाणाऱ्यांची थुंकण्याची गोची होते. मात्र, भिंती लाल करण्यास ते सदैव तयार असतात. बस स्टँड, नझूल कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती अशा विविध कार्यालय, व्यापारी संकुल एव्हढेच नव्हे तर मंदिराच्या पायऱ्या व बाहेरील कानाकोपऱ्याच्या ठिकाणच्या भिंतीवर थुंकीचे डाग आढळून येतात. बऱ्याच ठिकाणी ‘येथे थुंकू नये’,‘येथे थुंकण्यास मनाई आहे’ अशा आशयाचे फलक लावलेले असतात. मात्र, येथे थुंकु शकतात असा संदेश असल्याचे समजून अनेक महाभाग नेमके तेथेच थुंकून मोकळे होतात.
शहरात अनेक नवीन इमारतींच्या भिंतीही रंगल्या आहे. भरपूर निधी खर्च करून नागरिकांच्या सेवेसाठी शहरात अद्ययावत इमारती उभ्या झाल्या. या इमारतींमध्ये कामकाजही सुरू झाले. मात्र, काही महिन्यातच या इमारतीच्या पायऱ्या, स्वच्छतागृह, कोपरे थुुंकीच्या पिचकाऱ्यांनी रंगले गेल्याचे चित्र आहे.
बॉक्स
कार्यालयात गुटखा, पान खाण्यास बंदी
नगरपरिषदेच्या इमारतींची दशा पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयात कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत पान, सुपारी, गुटखा, तंबाखूचे सेवन करून नये, असा फतवा काढला. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करतील ते कर्मचारी कसले. चोरून लपून पान, सुपारी खाऊन थुंकण्याची सवय अनेक कर्मचारी जोपासत आहे. यावर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.