पुसद तालुक्यामध्ये कोरोनाचा हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 05:00 AM2020-08-25T05:00:00+5:302020-08-25T05:00:02+5:30
शहर व तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ३७ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून तालुक्यातील हुडी (बु) येथे १४ मे रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत आरोग्य व महसूल विभागाने तब्बल चार हजार ३१४ नागरिकांची चाचणी केली. त्यात दोन हजार ८१ नागरिकांची आरटीपीसीआर तर दोन हजार २३३ नागरिकांची रॅपिड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली.
प्रकाश लामणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. रविवारी तालुक्यातील जांबबाजार येथील ६२ वर्षीय इसम तर सोमवारी शहरातील नवीन पुसद भागातील ६२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्याची बळीसंख्या आता १७ वर पोहोचली आहे.
शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. आतापर्यंत ४७४ नागकिरांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ३६१ जणांनी कोरोनावर मात केली. गेल्या दोन दिवसात दोघांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या १७ वर पोहोचली. अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ९६ झाली आहे. शहर व तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ३७ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून तालुक्यातील हुडी (बु) येथे १४ मे रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत आरोग्य व महसूल विभागाने तब्बल चार हजार ३१४ नागरिकांची चाचणी केली. त्यात दोन हजार ८१ नागरिकांची आरटीपीसीआर तर दोन हजार २३३ नागरिकांची रॅपिड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली.
आतापर्यंत ४७४ बाधितांपैकी ३६१ जणांनी कोरोनावर मात केली. मात्र दिवसेंदिवस शहर व तालुक्यात रुग्णसंख्या वाढतच आहे. सुरुवातीला ७९ प्रतिबंधित क्षेत्र होते.
सध्या ही संख्या ३७ वर आली आहे. त्यापैकी शहरात १७ तर ग्रामीण भागात २० प्रतिबंधित क्षेत्र आहे. अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह ८२ रुग्णांपैकी २७ रुग्णांवर येथील आयुर्वेद महाविद्यालयाच्या डीसीएचसी सेंटरमध्ये तर उर्वरित ५५ रुग्णांवर यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी दिली. दरम्यान, सोमवारी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
फिजिकल डिस्टन्सिंगला नागरिकांची बगल
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. मात्र कोरोनाचा कहर वाढत असताना बाजारपेठ व रस्त्यावर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. नागरिकांनी गर्दी टाळून फिजिकल डिस्टन्सिंगसह शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रभारी उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ, गटविकास अधिकारी शिवाजी गवई, वैद्यकीय अधीक्षक डॉ.हरिभाऊ फुपाटे, मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड आदींनी केले आहे.