बाभूळगावातील घारफळ, सरुळ परिसराला गारपिटीचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 09:27 PM2024-02-10T21:27:39+5:302024-02-10T21:28:02+5:30
गहू, हरभऱ्याचे नुकसान : सकाळपासून ढगाळी वातावरण
यवतमाळ : बाभूळगाव तालुक्यातील घारफळ, सरुळ परिसराला शनिवारी सायंकाळी गारपिटीचा तडाखा बसला. यामुळे गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सकाळपासूनच परिसरात ढगाळी वातावरण होते. सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच गारा बरसल्या. बाभूळगाव तालुक्यातील घारफळ, सरुळ, परसोडी, शिंदी, पाचखेड, आष्टारामपूर, सौजना, एरंडगाव, वडगाव, मुबारकपूर, किन्ही, गोंधळी, गवंडी, महमदपूर आदी गावांना गारांनी झोडपले. शेतात गेलेले शेतकरी, शेतमजूरही यात सापडले.
खरीप हंगामात आलेली पिकांची तूट रब्बी हंगामात भरून निघावी म्हणून सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी गहू, हरभरा आदी पीक घेतले. ही पिके काढणीवर आलेली असतानाच परिसरातील काही गावांना गारपिटीचा तडाखा बसला. शेतशिवारातील उभी पिके वादळीवारा व गारपिटीने जमीनदोस्त झाली. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सरुळ परिसरातही गारपीटीने शेतकऱ्यांंचे मोठे नुकसान केले आहे. काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने पुरवठा खंडित झाला होता.