रमाई आवासच्या अर्जदारांना हेलपाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 09:53 PM2018-03-24T21:53:00+5:302018-03-24T21:53:00+5:30
रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी अर्जदारांना नगरपरिषदेकडून हेलपाटे दिले जात आहे. प्रत्येकवेळी विविध कारणे सांगितली जात आहे. घरकुलासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. त्यावेळी नगरपरिषदेने दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी अर्जदारांना नगरपरिषदेकडून हेलपाटे दिले जात आहे. प्रत्येकवेळी विविध कारणे सांगितली जात आहे. घरकुलासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. त्यावेळी नगरपरिषदेने दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे.
रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१० पासून ४३८ लोकांनी घरकुलासाठी नगरपरिषदेकडे अर्ज केले आहे. यात १९९ एपीएल व १४२ बीपीएल अर्जदारांचा समावेश आहे. दरम्यान, २१ लोकांना घरकुलाचा लाभ देण्यात आला. उर्वरित अर्जदारांच्या मागणीकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष सुरू आहे. दरम्यान, गुरुदेव युवा संघाच्या नेतृत्त्वात घरकुलासाठी येथील तिरंगा चौकात अन्नत्याग आंदोलन केले. त्यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले होते. यावरून एक महिन्याचा कालावधी लोटला. अर्ज पुढे सरकले नाही.
जिल्हाधिकारी, आयुक्त अमरावती यांच्याकडेही सदर प्रकरण मांडण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे रमाई आवास योजनेचे अर्जदार संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. वंचित घटकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावरही कारवाई न झाल्यास ३० मार्च रोजी पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळाने प्रशासनाला यासंदर्भात निवेदन दिले आहे.