‘मेडिकल’मध्ये स्पीच थेरपीसाठी चिमुकल्यांना हेलपाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 09:48 PM2019-06-30T21:48:36+5:302019-06-30T21:49:09+5:30

दोन्ही कानांनी बधीर असलेल्या चिमुकल्या मुला-मुलींना नियमितपणे स्पीच थेरपी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी दररोज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हेलपाटे मारत आहे. मात्र मेडिकलमध्ये संबंधित डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने त्यांना परत जावे लागत आहे.

Hailpate spit for spike therapy in 'Medical' | ‘मेडिकल’मध्ये स्पीच थेरपीसाठी चिमुकल्यांना हेलपाटे

‘मेडिकल’मध्ये स्पीच थेरपीसाठी चिमुकल्यांना हेलपाटे

googlenewsNext
ठळक मुद्देतंत्रज्ञाचा अभाव : शस्त्रक्रियेचा दहा लाखांचा खर्च व्यर्थ ठरण्याची पालकांना भीती, अधिष्ठात्यांकडे धाव

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दोन्ही कानांनी बधीर असलेल्या चिमुकल्या मुला-मुलींना नियमितपणे स्पीच थेरपी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी दररोज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हेलपाटे मारत आहे. मात्र मेडिकलमध्ये संबंधित डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने त्यांना परत जावे लागत आहे.
जन्मत: कर्णबधीर असलेल्या मुलांना बोलण्याचे कौशल्य अवगत होत नाही. अशा मुलांवर पालकांनी साडेदहा लाख रुपयांची जुळवाजुळव करून यशस्वी शस्त्रक्रियाही करून घेतली. मात्र शस्त्रक्रियेनंतर जवळपास तीन वर्षापर्यंत या मुलांना नियमित स्पीच थेरपी घ्यावी लागते. यवतमाळ जिल्ह्यात स्पीच थेरपीची सर्वोत्तम सुविधा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच उपलब्ध आहे. त्यामुळे घाटंजी, वणी, उमरखेड, पुसद, महागावसारख्या गावातील पालक आपल्या शस्त्रक्रिया झालेल्या मुलांना येथील मेडिकलमध्ये आणतात.
आजपर्यंत मेडिकलमध्ये डॉ. नीता मेश्राम यांनी अतिशय उत्तम स्पीच थेरपी दिली. मात्र दीड महिन्यापूर्वी त्यांच्या सहायकाची लातूर येथे बदली झाली. तर डॉ. मेश्राम यांच्याकडे अन्य विभागाचाही अतिरिक्त भार टाकण्यात आला आहे. त्यामुळे स्पीच थेरपीसाठी वेळ देणे त्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. शस्त्रक्रिया झालेले जवळपास ३० चिमुकले दररोज तर काही जण दर आठवड्याला थेरपीसाठी मेडिकलमध्ये येत आहे. मात्र थेरपी मिळत नसल्याने दिवसभर वाट पाहून सायंकाळी परत जात आहे. अखेर त्रस्त पालकांनी शुक्रवारी अधिष्ठातांकडे तक्रार दाखल केली. त्यावेळी तात्पुरता टेक्निशीयन नेमण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे अधिष्ठातांनी पालकांना सांगितले. मात्र ही जागा तातडीने न भरल्यास चिमुकल्यांचे भवितव्य संकटात सापडण्याची भीती आहे.
बोलण्यात वाढतेय व्यंग
शस्त्रक्रिया झालेले ३० चिमुकले स्पीच थेरपीसाठी मेडिकलच्या चकरा मारत आहे. शस्त्रक्रिया न झालेलेही तेवढेच चिमुकले थेरपीच्या प्रतीक्षेत आहेत. यात अर्धवट ऐकू येणारे, गतिमंद अशा मुलांचाही समावेश आहे. शस्त्रक्रियेनंतर तीन वर्ष नियमित थेरपी न घेतल्यास मुलांच्या बोलण्यात व्यंग निर्माण होते. गेल्या दीड महिन्यांपासून स्पीच थेरपीमध्ये खंड पडत असल्यामुळे काही मुलांचे बोलणे चुकत आहे. आंबा म्हणताना आबा असा उच्चार होत आहे. त्यामुळे पालकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे.

मी रोजमजुरी करून आणि शासकीय मदत मिळवून माझ्या तीन वर्षाच्या मुलीवर नागपुरात शस्त्रक्रिया केली. आता स्पीच थेरपीसाठी यवतमाळच्या मेडिकलमध्ये मुलीला नियमित घेऊन जातो. मात्र दीड महिन्यांपासून संबंधित डॉक्टरची सेवा उपलब्ध होणे कठीण झाले आहे.
- मोहम्मद अमीर शेख
पालक, कुऱ्हाड ता. घाटंजी

Web Title: Hailpate spit for spike therapy in 'Medical'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.