अर्ध्या तासात ‘अॅन्सर-की’
By admin | Published: November 28, 2015 03:20 AM2015-11-28T03:20:07+5:302015-11-28T03:20:07+5:30
जिल्हा परिषदेत विविध संवर्गातील १९५ रिक्तपदासाठी जम्बो भरती प्रक्रिया घेतली जात आहे.
जिल्हा परिषद पदभरती : पुसद, आर्णीतही परीक्षा केंद्र
यवतमाळ : जिल्हा परिषदेत विविध संवर्गातील १९५ रिक्तपदासाठी जम्बो भरती प्रक्रिया घेतली जात आहे. लेखी परीक्षा संपताच अर्ध्यातासाच्या आत उमेदवारांना आॅनलाईन अॅन्सर की पाहता येणार आहे. प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी निवड समितीने ही सोय केली आहे. शिवाय यातील उत्तराबाब संभ्रम असल्यास २४ तासाच्या आत आक्षेप घेण्याची मुभा दिली आहे.
विविध पदाच्या १५ संवर्गाच्या १९५ जागेसाठी एक लाखावर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे लेखी परीक्षेचे नियोजन करताना निवड समितीला चांगलीच कसरत करावी लागत आहे. खुद्द जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह, सीईओ डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भरती प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेतली. परीक्षा केंद्रावर महसूलातील उपजिल्हाधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परिचर आणि कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज असल्याने यवतमाळ सोबतच पुसद, आर्णी येथेही परीक्षा केंद्र देण्यात येत आहे. यवतमाळात केवळ १२ हजार उमेदवारांची परीक्षा घेण्याची व्यवस्था आहे. परिचर पदासाठी १७ हजार तर ग्रामसेवकासाठी २० हजार उमेदवार आहेत. लेखी परीक्षेनंतर अॅन्सर की प्रसिध्द झाल्यानंतर २४ तासातच उमेदवारांची तात्पुरती निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी पात्रतेच्या कागदपत्राची पडताळणी करून अंतीम यादी जाहीर होणार आहे. निकाल जाहीर होऊनही नियुक्ती देण्यासाठी होणारी टाळाटाळ होणार नसल्याचे असे डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले. अंतीम यादीतील उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)