यवतमाळात ‘चक्रीधरणे’त शेतकऱ्यांनी केले अर्धनग्न आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:39 AM2018-01-24T11:39:00+5:302018-01-24T11:40:44+5:30
शासनाच्या नाकर्तेपणाने देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांनी यवतमाळात पाच दिवसांपासून चक्रीधरणे आंदोलन सुरू केले. मंगळवारी शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासनाच्या नाकर्तेपणाने देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांनी यवतमाळात पाच दिवसांपासून चक्रीधरणे आंदोलन सुरू केले. मंगळवारी शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. दररोज अभिनव पद्धतीने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे नेतृत्व मंगळवारी हिंगोलीचे खासदार अॅड. राजीव सातव यांनी केले.
शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात यवतमाळच्या तिरंगा चौकात शुक्रवारपासून शेतकऱ्यांनी शासनविरोधात एल्गार पुकारला आहे. दररोज एका विधानसभा क्षेत्रातील शेतकरी तिरंगा चौकात एकत्र येऊन आंदोलन करीत आहे. मंगळवारी उमरखेड विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. शासनाने शेतकऱ्यांना तसेही अर्धनग्न केले आहे. उद्धस्त झालेल्या या शेतकऱ्यांनी शर्ट आणि बनियान काढून केवळ पँट घालून हे आंदोलन केले. यावेळी खासदार राजीव सातव, माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे गटनेते राम देवसरकर, शेतकरी संघर्ष समितीचे प्रवीण देशमुख, अरूण राऊत, अशोक बोबडे, अनिल गायकवाड, अशोक भुतडा, शिवाजी सवनेकर, अविनाश काकडे, दिनेश गोगरकर, रमेश चव्हाण, नंदु अग्रवाल, सलीम सिद्धीकी, शैलेश कोपरकर, सोनू खातीब, शैलेश अनखुळे, बाबू दुर्गमवार, स्वप्नील नाईक, बालाजी आगलावे, अरविंद माने आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
शिवसेना-भाजपा युती सरकार शेतकरी विरोधी आहे. या सरकारने शेतकऱ्यांना पोत्यावर आणले, असे म्हणत आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांनी अंगात पोत्यांचा सदरा घालून आणि गळ्यात अळीग्रस्त बोंडांच्या माळा घातल्या. हातात बेशरमचे झाड उंचावून सरकारचा निषेध केला.
दुसऱ्या दिवशी रक्तदान शिबिर आंदोलन घेण्यात आले. सरकारच्या अंगात शेतकऱ्यांचे रक्त नाही. त्यामुळे रक्तदानाच्या माध्यमातून सरकारच्या अंगात शेतकऱ्यांचे रक्त संचारावे आणि शेतकरी मदतीची भावना निर्माण व्हावी, ही यामागची भूमिका होती. तिसऱ्या दिवशी मुंडण करून शासनाचा निषेध केला, तर चौथ्या दिवशी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांनी शासनविरोधी टाहो फोडला. गत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची अद्याप शासनाने दखल घेतली गेली नाही. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र करून राज्यभर पोहोचविण्याचा निर्धार शेतकरी संघर्ष समितीने केला.