अद्याप अर्धे विद्यार्थी गणवेशाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 09:44 PM2017-09-12T21:44:04+5:302017-09-12T21:44:04+5:30

शैक्षणिक बाबीला प्रोत्साहन मिळावे यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश वाटप ही योजना सुरू करण्यात आली. मात्र, यावर्षी अर्धे सत्र संपत आले तरी गणवेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले नाही.

Half of the students are still without uniform | अद्याप अर्धे विद्यार्थी गणवेशाविनाच

अद्याप अर्धे विद्यार्थी गणवेशाविनाच

Next
ठळक मुद्देअर्धे सत्र झाले : ४०० रुपयांसाठी करावा लागतोय दोन हजारांचा खर्च

मुकेश इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : शैक्षणिक बाबीला प्रोत्साहन मिळावे यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश वाटप ही योजना सुरू करण्यात आली. मात्र, यावर्षी अर्धे सत्र संपत आले तरी गणवेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले नाही. दारव्हा तालुक्यातील पन्नास टक्केपेक्षा जास्त विद्यार्थी या लाभापासून वंचित असल्याचे समोर आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांने बँकेत संयुक्त खाते उघडण्याची अट घालून देण्यात आली आहे. परंतु खाते उघडून त्यामध्ये दोन हजार रुपये जमा ठेवावे लागतात आणि भेटतात मात्र चारशे रुपये. त्यामुळे चारशे रुपयांसाठी दोन हजारांचा खर्च परवडणारा नसल्यामुळे पालकांची मोठी अडचण झाली आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील सर्व मुली अनुसूचित जाती मुले, अनुसूचित जमाती मुले व दारिद्र्य रेषेखालील मुलांना मोफत शालेय गणवेश पुरविण्यात येतो. पूर्वी प्रत्येक शाळेतील पात्र विद्यार्थ्यांच्या गणवेशाची रक्कम मुख्याध्यापकाच्या बँकेत जमा झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीमार्फत निविदा प्रक्रिया पूर्ण करून गणवेश खरेदी व्हायची. त्यामुळे सर्वांना वेळेवर गणवेश मिळायचे. परंतु आता मात्र ५ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार पात्र विद्यार्थ्यांने आईसाबत बँकेत संयुक्त खाते उघडून गणवेशाची खरेदी करायची व त्याबाबतची पावती मुख्याध्यापकांना दाखविल्यानंतर त्याच्या खात्यात चारशे रुपये जमा केले जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्याच विद्यार्थ्याचे आईसोबत संयुक्त बँक खाते राहात नाही. नव्याने खाते उघडायचे म्हटले तर सध्या बँकांमध्ये किमान दोन हजार रुपये डिपॉझीट ठेवावे लागतात व इतर खर्च वेगळा. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी बँकेत खाते उघडले नाही. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. दारव्हा तालुक्यात एकूण पात्र विद्यार्थी ११ हजार ८४१ आहेत. त्यामध्ये सर्व मुली आठ हजार १७, अनुसूचीत जमाती मुले ९८४ अनुसूचित जमाती मुले ८६२ व दारिद्र्य रेषखालील मुले एक हजार ९७८ आहेत. या सर्वांची ४७ लाख ३६ हजार ४०० रुपये एवढी रक्कम प्रत्येकी मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. मात्र, यापैकी केवळ ४० टक्के विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम वळती झाली असेल इतर ६० टक्के रक्कम तशीच मुख्याध्यापकाच्या खात्यात पडून असल्याची माहिती मिळाली. याबाबत आवश्यक ती प्रक्रिया शाळेकडूनही तत्परतेने होताना दिसत नाही.
त्यामुळे दारव्हा तालुक्यातील जवळपास ६० टक्के विद्यार्थी शालेय गणवेशाविना शाळेत जात असल्याचे स्पष्ट होते. १५ आॅगस्टसारख्या महत्वाच्या दिवशीही या विद्यार्थ्यांच्या अंगावर शालेय गणवेश नव्हता. त्यामुळे २६ जानेवारीला तरी विद्यार्थी शालेय गणवेशात हजर राहतील की नाही, याबाबत शंका आहे. शासनाच्या या जाचक अटीला कंटाळून काही गावातील सर्व पालकांनी स्वत:च्या खर्चाने आपल्या पाल्यांकरिता गणवेश खरेदी केले. पिंपळगाव चोरखोपडी, यासह काही ठिकाणी हे प्रयोग झाले. शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २६ जुलैला सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंतही गणवेशाचा घोळ संपला नाही. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.
माहिती गोळा करणे सुरू
नेमक्या किती विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेशाची रक्कम जमा झाली याची माहिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध नाही. मात्र, अनेकांना अद्यापही रक्कम मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. गणवेशाबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता मुख्याध्यापकांकडून ही माहिती मागविली जात असून, त्यानंतर काय तो निर्णय होईल.

Web Title: Half of the students are still without uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.