अर्ध्यावरती डाव मोडला, ‘मजुरी’ एक कहानी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:00 AM2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:00:14+5:30

मजुरीपायी गरीब माणसांचे आजन्म होणारे हाल आणि हाल भोगतच पत्करावा लागणारा मृत्यू ही विसंगती उघड करणारी थरारक घटना मंगळवारी पहाटेच्या अंधारात आर्णी तालुक्यात घडली. मरणारे मूळचे छत्तीसगढ-झारखंडचे, कामासाठी जगले महाराष्ट्राच्या सोलापूरमध्ये, पण कुठलाही थांगपत्ता नसताना त्यांचा मृत्यू झाला यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीमध्ये.

Halfway through the innings, 'Wages' is a story ... | अर्ध्यावरती डाव मोडला, ‘मजुरी’ एक कहानी...

अर्ध्यावरती डाव मोडला, ‘मजुरी’ एक कहानी...

Next
ठळक मुद्देजीवनाकडे धावताना मृत्यूने गाठले : आर्णीच्या अपघातात स्थलांतरित चार मजुरांचा अंत

अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना अक्षरश: काळ बनून आला आहे. या विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी असला तरी आता कोरोनाच्या संक्रमणाआधी नुसत्या भयाने मृत्यूसंख्या वाढत आहे. संक्रमण टाळण्यासाठी मजुरांना अडविण्यात आले, मग सोडण्यात आले... मृत्यू टाळून आपले मूळगाव गाठून आनंदाने जगण्यासाठी हे मजूर धावत सुटले. मात्र अर्ध्यातच त्यांना मृत्यूने गाठले. मजुरी करून पोटात दोन घास टाकण्याची सोय व्हावी म्हणून घरापासून हजारो किलोमीटर लांब आलेल्या या कष्टकरी जीवांना अखेर अर्ध्यातच जीवनाचा डाव मोडावा लागला.
मजुरीपायी गरीब माणसांचे आजन्म होणारे हाल आणि हाल भोगतच पत्करावा लागणारा मृत्यू ही विसंगती उघड करणारी थरारक घटना मंगळवारी पहाटेच्या अंधारात आर्णी तालुक्यात घडली. मरणारे मूळचे छत्तीसगढ-झारखंडचे, कामासाठी जगले महाराष्ट्राच्या सोलापूरमध्ये, पण कुठलाही थांगपत्ता नसताना त्यांचा मृत्यू झाला यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीमध्ये.
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सोलापूरमधील मजुरांना घेऊन एसटी बस (क्र.एमएच-१४-बीटी-४६५१) सोमवारी रात्री झारखंडकडे निघाली. सोलापूर ते यवतमाळ हे अंतर कापता-कापता पहाट झाली. मंगळवारी पहाटे ३.३० वाजता आर्णीजवळच्या कोळवण गावानजीक या बसचा भीषण अपघात झाला आणि त्यात चार जण ठार झाले. बस चालक सुनील शिंदे, अनुज मांजी, सुनीता शाहू, शशीलता यादव यांचा मृतकात समावेश आहे. तर २४ जण गंभीर जखमी झाले.
पोटाची खळगी भरण्यासाठी हे लोक झारखंड, छत्तीसगड सारख्या राज्यातून महाराष्ट्रात आले होते. घरापासून एवढ्या दूर येऊन त्यांना काही क्लासवन ऑफीसरचा पगार नव्हता. दिवसभर राबणे आणि रात्री पालावरच दोन घास खाणे, सकाळी उठून पुन्हा राबणे हाच त्यांचा रतीब होता. पण श्रीमंतांनी देशात आणलेल्या कोरोनामुळे या गरिबांचे जीवन उद्ध्वस्त केले. देशात लॉकडाऊन सुरू झाले. मजुरांचे काम गेले अन् गावाकडे जावे तर सरकारने रस्तेच बंद केले. तब्बल दोन महिने उपाशी-तापाशी, परगावात उपऱ्यासारखे जगल्यानंतर सरकारने उपकार म्हणून या मजुरांना मूळगावात जाण्याची परवानगी दिली. सोलापूरचे हे मजूर कसेही करून घर गाठावे म्हणून सोमवारी रात्री एसटी बसमध्ये चढले. पण घर शेकडो मैल दूर असतानाच मध्येच जग सोडून गेले. त्यांच्या आर्त किंकाळ्या सरकारच्या कानठळ्या बसविणाºया होत्या. पण सरकारपर्यंत त्या पोहोचल्या नाही. मरणाऱ्यांच्या हाका फक्त आर्णीतील संवेदनशील माणसांंनीच ऐकल्या आणि तेच मदतीसाठी धावत गेले. पण मृत्यूचा वेग आर्णीकरांपेक्षाही जास्त होता.

एसटी चालकाला दिवसभराचा ताण अन् पहाटेची डुलकी
स्थलांतरित मजुरांचा जीव घेणारा हा अपघात नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर घडला. सध्या आर्णीनजीक या महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी मध्यप्रदेशातील दिलीप बिल्डकॉन कंपनीचे बांधकाम साहित्य रस्त्यावर विखुरलेले आहे. कंपनीचे ट्रक, टिप्पर वाटेल तसे रस्त्यावरच उभे केले जात आहे. लॉकडाऊन असल्याने फारशी वाहतूक राहणार नाही म्हणून या कंपनीचा एक टिप्पर कोळवण गावाजवळ चक्क महामार्गावरच उभा करून ठेवण्यात आला. नेमक्या याच उभ्या टिप्परवर सोलापूरकडून आलेली मजुरांची भरधाव बस धडकली. सोलापूरमधून बस घेऊन निघालेला बसचालक रात्रभर बस चालवित होता. त्यामुळे झोपेचा साहाजिकच ताण होता. शिवाय लॉकडाऊनमुळे आपल्या नोकरीचे काय हा ताणही प्रत्येक महामंडळ कर्मचाºयाच्या डोक्यावर आहेच. त्यातच पहाटे-पहाटे झोपेची डुलकी असह्य झाली आणि बस उभ्या टिप्परला भिडली. घरी पोहोण्याचे स्वप्न भंगले.

Web Title: Halfway through the innings, 'Wages' is a story ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.