तूर खरेदी केंद्रात हमालांची हाणामारी
By admin | Published: May 4, 2017 12:14 AM2017-05-04T00:14:02+5:302017-05-04T00:14:02+5:30
येथील शासकीय तूर खरेदी केंद्रात पोलिसांसमक्षच हमालांमध्ये हाणामारी झाली. यात चक्क शस्त्रही निघाले.
पोलिसांंसमक्ष घटना : दगडही भिरकावला
यवतमाळ : येथील शासकीय तूर खरेदी केंद्रात पोलिसांसमक्षच हमालांमध्ये हाणामारी झाली. यात चक्क शस्त्रही निघाले. ही घटना बघणाऱ्या शेतकऱ्यांवर दगड भिरकावण्यात आला. काटा व चाळणी फेकण्यात आली. एवढेच नव्हे, तर पोलिसाचे दुचाकी वाहनही पाडण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजता घडली.
येथील बाजार समितीत सर्वाधिक तूर विक्रीस आली. यामुळे केंद्रावर कोणताही गोंधळ उडू नये म्हणून आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी बाजार समितीच्या आवारातच पोलीस चौकी सुरू करण्यात आली. असे असतानाही बुधवारी दुपारी हमालांमध्ये अंतर्गत कारणावरून फ्री स्टाईल झाली. यात शस्त्रही निघाले. हा प्रकार पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर एका हमालाने चक्क दगड भिरकावला. तेथे तैनात पोलिसाचे वाहनही आडवे केले. ही घटना घडली त्यावेळी बाजार समितीच्या आवारात केवळ एकच पोलीस होता. त्यांनी एकदा संबंधित हमालाला हटकले. मात्र त्याला न जुमानता त्याने शेतकऱ्यांवर दगड भिरकावत काटा व चाळणी फेकून दिली. यामुळे शेतकरी संतापले होते. काही काळानंतर तेथे इतर पोलीस धडकले. त्यांनी आपल्या सहकाऱ्याला तेथून परत नेले. मात्र परिस्थतीवर नियंत्रण मिळविण्याचा कोणताच प्रयत्न केला नाही. हमालांमधील हाणामारीत चक्क शस्त्र निघताच काही हमालांनी तिकडे धाव घेत दुसऱ्या हमालाचे प्राण वाचविले. (शहर वार्ताहर)