अपंग दिलीपच्या दानाने वाहतो माणुसकीचा झरा
By admin | Published: April 9, 2016 02:45 AM2016-04-09T02:45:29+5:302016-04-09T02:45:29+5:30
धनाढ्य दानकर्त्यांच्या तुलनेत श्रेष्ठ ठरावे असे त्यांचे ते दान. त्या दानाला मानवतेची, आत्मियतेची, त्या पाठीमागील भावनेची किनार.
घाटंजी : धनाढ्य दानकर्त्यांच्या तुलनेत श्रेष्ठ ठरावे असे त्यांचे ते दान. त्या दानाला मानवतेची, आत्मियतेची, त्या पाठीमागील भावनेची किनार. शारीरिकदृष्ट्या अपंग पण विचार पंगू नाहीत. त्या विचारात मानवतावादी दृष्टिकोन. शारीरिक अपंगत्वामुळे स्वत: झेलत असलेल्या अडचणींवर मात करत दुसऱ्यांना आनंद देण्याचा, त्यांचे कष्ट होईल तेवढे कमी करण्याचा त्याचा प्रयत्न. या प्रयत्नातून त्याने स्वत:ची तीनचाकी सायकल दुसऱ्या एका अपंग व्यक्तीला दान देवून त्याचे जीणे सुसह्य करण्याचा त्याचा अंतरिक हेतू. हे निश्चितच एखाद्या धनाढ्य दानशुराच्या तुलनेत जड भरणारे आहे.
राजूरवाडी येथील दिलीप निखाडे हे अपंग आहेत. त्यांच्याकडे तीनचाकी सायकल आहे. घाटंजी येथील युवा संघटना अपंगांसाठी काम करते आहे, हे त्यांच्या कानी गेले. दिलीपने या युवकांची भेट घेतली. तुमच्या कार्यात माझेही योगदान असावे, असा मनोदय व्यक्त केला. त्याने जे देण्यायोग्य आहे, ते स्वत:ची तीन चाकी सायकल दान दिली. त्याच्या या दानाने युवक संघटना भारावून गेली. त्याची ही माणूसकी प्रेरणादायी ठरावी अशीच आहे. या युवक संघटनेच्या माध्यमातून दिलीपने दिलेली सायकल हिवरधरा येथील अत्यंत गरीब असलेल्या अपंग सीताराम तोडसाम यांना दान दिली. (तालुका प्रतिनिधी)