मुलांना दिवाळीची खुशखबर, शाळेत खिचडीसोबत बिस्कीटही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 05:00 AM2021-10-25T05:00:00+5:302021-10-25T05:00:02+5:30
ही बिस्किटे ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन आणि तांदळापासून बनविलेली असतील. आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या या बिस्किटांना न्यूट्रिटिव्ह स्लाइस म्हटले जाणार आहे. विशेष म्हणजे पाचही प्रकारचे स्लाइस २४ दिवसांसाठी एकाच वेळी विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार आहेत. आकर्षक पॅकिंग आणि मुलांना आवडणारी चव ही या स्लाइसची वैशिष्ट्ये राहणार आहेत. विशेष म्हणजे शिक्षण विभागाने स्लाइस पुरवठ्यासाठी जालना येथील एसआरजे फूडस् या संस्थेला नुकतीच ऑर्डरही दिली आहे.
अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शाळेत रोजरोज तीच-तीच खिचडी खाऊन कंटाळलेल्या मुलांसाठी खुशखबर आहे. दिवाळीनंतर शाळा सुरू होताच आता खिचडीसोबतच बिस्किटाचे पाच पुडेही मिळणार आहेत.
मात्र, ही बिस्किटे ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन आणि तांदळापासून बनविलेली असतील. आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या या बिस्किटांना न्यूट्रिटिव्ह स्लाइस म्हटले जाणार आहे. विशेष म्हणजे पाचही प्रकारचे स्लाइस २४ दिवसांसाठी एकाच वेळी विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार आहेत. आकर्षक पॅकिंग आणि मुलांना आवडणारी चव ही या स्लाइसची वैशिष्ट्ये राहणार आहेत. विशेष म्हणजे शिक्षण विभागाने स्लाइस पुरवठ्यासाठी जालना येथील एसआरजे फूडस् या संस्थेला नुकतीच ऑर्डरही दिली आहे.
रुचकर चवीसोबतच आरोग्यदायकही
कोविडचे संकट पाहता शासनाचा निर्णय योग्यच आहे. शाळा स्तरावरही अंमलबजावणी उत्तम केली जाईल. मुलांच्या आरोग्यासाठी हे पदार्थ चांगले आहे. त्यामुळे मुलांकडूनही प्रतिसाद मिळेल.
-गजानन हागे पाटील, शिक्षक
या स्लाईसची चव चांगली असून आरोग्यासाठीही ते चांगले आहे. त्याचे वाटप करणेही सोईस्कर आहे. हा माल खराब होत नाही. त्यामुळे या नव्या निर्णयाचे मनापासून स्वागतच आहे.
- इनायत खान, मुख्याध्यापक
स्वयंपाकी करणार मदत
- जालना येथून शाळा स्तरावर या बिस्कीट वजा न्यूट्रिटिव्ह स्लाइसचा पुरवठा होणार आहे.
- हे सर्व पदार्थ शाळेत साठवून ठेवण्यासाठी, तसेच त्यांचे वाटप करण्यासाठी शाळेतील स्वयंपाकी मंडळींची मदत घेण्याचे निर्देश आहे.
- त्यामुळे पोषण आहार स्वयंपाकी कायम राहतील.
ऑर्डर दिली, लवकरच येईल
ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या रक्तात एचबी कमी आढळते. शाळेतून मिळालेल्या गोळ्याही मुले सहसा घेत नाहीत. त्यामुळे न्यूट्रिटिव्ह स्लाइसद्वारे त्यांना पोषक आहार दिला जाणार आहे. त्याची ऑर्डर दिली आहे.
-प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी