‘हर घर गोठा’ योजना पशुपालकांसाठी ठरली वरदान, १२१ प्रस्तावांना मंजुरात : मारेगाव तालुक्यात ७० गोठ्यांचे बांधकाम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:44 AM2021-08-26T04:44:34+5:302021-08-26T04:44:34+5:30
तालुक्यातील अनेक लहान-मोठे शेतकरी, शेतमजूर पशुपालन करतात. त्यातून त्यांना आर्थिक लाभही होतो; परंतु जनावरांच्या गोठ्याकडे फारसे लक्ष दिल्या जात ...
तालुक्यातील अनेक लहान-मोठे शेतकरी, शेतमजूर पशुपालन करतात. त्यातून त्यांना आर्थिक लाभही होतो; परंतु जनावरांच्या गोठ्याकडे फारसे लक्ष दिल्या जात नसल्याने ही जनावरे नेहमी ऊन, वारा, पावसात असतात. शासनाने रोजगार हमी योजनेतून सन २०२०-२१ मध्ये गोठा बांधकाम योजना सुरू केली. यासाठी ७० हजार रुपयांचे अनुदान आहे. एका वर्षात गावातील पाच लाभार्थींची निवड होते. यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव जोडून लाभार्थीला पंचायत समितीकडे अर्ज द्यावा लागतो. ही योजना सुरू होताच, शेकडो पशुपालकांनी गोठा बांधकामासाठी पंचायत समितीकडे अर्ज केले. त्यापैकी १२१ पशुपालकांना या वर्षात तांत्रिक मान्यता देण्यात आली. त्यापैकी ७० जनावरे गोठा बांधकामे सुरू आहे. दरवर्षी ही योजना सुरू राहणार असल्याने आता पाळीव जनावरांना अच्छे दिन येणार, असे बोलल्या जात आहे. शेतकऱ्यांसाठी लाभदायी असलेल्या या योजनेतील अटी शिथिल करून मागेल त्याला गोठा बांधकाम परवानगी द्यावी, तसेच बांधकाम साहित्याचे वाढलेले दर पाहता मिळणाऱ्या अनुदान रकमेत बांधकाम होत नसल्याने अनुदान रकमेत वाढ करावी, अशी मागणी होत आहे.