कंत्राटदाराच्या श्रीमुखात हाणली
By admin | Published: February 15, 2017 02:48 AM2017-02-15T02:48:12+5:302017-02-15T02:48:12+5:30
येथील नगरपरिषदेत स्वच्छतेच्या मुद्यावरून एका नगरसेविकेने संताप व्यक्त केला. या वादात त्यांच्या समर्थकाने
स्वच्छतेची समस्या : सीओंच्या कक्षासमोरील प्रकार
यवतमाळ : येथील नगरपरिषदेत स्वच्छतेच्या मुद्यावरून एका नगरसेविकेने संताप व्यक्त केला. या वादात त्यांच्या समर्थकाने चक्क सफाई कंत्राटदाराच्या श्रीमुखात हाणली. हा प्रकार मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच घडल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली.
शहरातील प्रभाग क्रमांक नऊमधील बराचसा भाग नव्याने नगरपरिषदेशी जुळला. या भागात बहुतांश मुस्लीम वसाहती आहे. तेथे गेल्या दोन महिन्यांपासून स्वच्छतेची कोणतीच कामे झाली नसल्याची तक्रार करीत नगरसेविका नगरपरिषदेत पोहोचल्या. त्यांनी सफाईसाठी मनुष्यबळ पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराकडून उडवाउडवी केली जात असल्याचा आरोप केला. यातून वाद वाढला. परिणामी मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच नगरसेविकेच्या समर्थकाने संतापाच्या भरात सफाई कंत्राटदाराच्या श्रीमुखात हाणली. नंतर लगेच ज्येष्ठ सदस्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हा वाद नंतर मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात पोहोचला. मुख्याधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली. यावेळी बांधकाम सभापती, विरोधी पक्षनेते, काही नगरसेवक उपस्थित होते. सीओ सुदाम धुपे यांनी आरोग्य निरीक्षक, प्रभागातील शिपाई व कंत्राटदार यांना समोरासमोर उभे करून तेथील समस्या निकाली काढण्याची सूचना केली. शिवाय दर बुधवारी सकाळी स्वत: प्रभागात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर नगरसेविकेचे समाधान झाले. सर्वसाधारण सभेपूर्वीच पालिकेत हा राडा झाल्याने दिवसभर चर्चा सुरू होती. (कार्यालय प्रतिनिधी)