हर्षलने शोधला मशरूम शेतीतूून उन्नतीचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 10:58 PM2018-03-05T22:58:45+5:302018-03-05T22:58:45+5:30
‘गरजेपोटी जन्मे युक्ती, प्रसंग आणिता वाढे शक्ती, प्रयत्न पेरता फळे येती, आवडी एैसे’ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत म्हटल्याप्रमाणे गरज ही मानवाला धडपड करायला लावते. त्यातून जिद्द निर्माण होऊन नवनिर्माण घडू शकते.
आॅनलाईन लोकमत
मांगलादेवी :
‘गरजेपोटी जन्मे युक्ती, प्रसंग आणिता वाढे शक्ती, प्रयत्न पेरता फळे येती, आवडी एैसे’
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत म्हटल्याप्रमाणे गरज ही मानवाला धडपड करायला लावते. त्यातून जिद्द निर्माण होऊन नवनिर्माण घडू शकते.
आज सर्वत्र निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी, शासनाचे अडेलतट्टू धोरण, त्यामुळे आजचा तरुण शेतीकडे न वळता नोकरी, व्यवसायाच्या मागे लागला आहे. परंतु बेरोजगारीचा प्रश्नही गंभीर आहे. रोजगाराच्या संधी नाही म्हणून तो स्वस्थ बसला नाही. मशरूमच्या शेतीतून त्याने बेरोजगारीवर मात करीत प्रगतीचा, उन्नतीचा मार्ग शोधला आहे.
नेर तालुक्याच्या मांगलादेवी येथील हर्षल विजय राऊत याची ही यशकथा. इतर तरुणांनीसुद्धा आदर्श घ्यावा, अशी त्याच्या श्रमाची किमया आहे. वडील राष्ट्रसंतांच्या विचारधारेचे, शिक्षकी पेशा. हर्षल सध्या अमरावती येथे बीएससी कृषीच्या अंतिम वर्षाला शिकत आहे. शेती निसर्गावर अवलंबून आहे, तर नोकरीच्या संधी फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणून त्याने जास्त नफा मिळवून देणारा मशरूम शेतीचा पर्याय निवडला. त्याने घरीच बेडवर मशरूमची लागवड केली. त्यासाठी सोयाबीनचे कुटार, ताराच्या रिंग, दोरी, फार्मालीन आदी साहित्याची जुळवाजुळव केली. सोयाबीनचे कुटार रात्रभर पाण्यात भिजवू घातले. नंतर त्याला सकाळी गरम पाण्यात उकळून थंड होऊ दिले. त्यात मशरूमचे बुरशी लागलेले गहू कुटारात मिसळून प्लास्टिकमध्ये भरले. नंतर तारेच्या गोल रिंगमध्ये ठेऊन एकमेकांवर दोरीने टांगले.
प्रत्येक बेडमधून ४० दिवसात मशरूमचे पीक घेतल्या जाते. एका बेडचा उपयोग सलग तीनवेळा घेता येतो. चांगले मोठे वाढलेले मशरूम काढून त्याला सुकवून बाजारात विक्रीस पाठविले जाते. बाजारात १२०० रुपये किलो भाव आहे. त्याचा खर्च सुरुवातीला अंदाजे तीन ते चार हजार रुपये आहे तर, उत्पन्न अंदाजे २१ हजार रुपये येईल, असा विश्वास हर्षल राऊतने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.