चांगले व्यवहार ठेवले, म्हणजे गुन्हा केला काय? आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा शेवटचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 10:03 AM2017-12-08T10:03:25+5:302017-12-08T10:04:24+5:30
‘आतापर्यंत बँके बरोबर रेग्यूलर व्यवहार केल्याने मी कर्जमुक्तीमध्ये बसलो नाही, व्यवहार चांगले ठेवणे म्हणजे गुन्हा केला काय ?, हेच कळत नाही, बँकेतून दररोज फोन येतात, त्यांना तोंड दाखवायला जागा नाही’ अशा शब्दात सरकारच्या कर्जमाफीला सणसणीत चपराक लावणारी चिठ्ठी सोयजनाच्या ज्ञानेश्वर मिसाळ या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिली.
सुरेंद्र राऊत ।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : ‘आतापर्यंत बँके बरोबर रेग्यूलर व्यवहार केल्याने मी कर्जमुक्तीमध्ये बसलो नाही, व्यवहार चांगले ठेवणे म्हणजे गुन्हा केला काय ?, हेच कळत नाही, बँकेतून दररोज फोन येतात, त्यांना तोंड दाखवायला जागा नाही’ अशा शब्दात सरकारच्या कर्जमाफीला सणसणीत चपराक लावणारी चिठ्ठी सोयजनाच्या ज्ञानेश्वर मिसाळ या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिली. त्याच्या चिठ्ठीतील प्रत्येक शब्दातून शेतकऱ्याची आजची अवस्था आणि शासनाची धोरणे स्पष्ट होते. शेतकरी मृत्यूला का कवटाळतो, याचे उत्तरही शोधण्याचा प्रयत्न आपल्या चिठ्ठीत केला आहे.
यवतमाळच्या भारत लॉजमध्ये बुधवारी ज्ञानेश्वर मिसाळ (५६) रा. सोयजना ता. मानोरा (जि. वाशिम) या शेतकºयाने विषप्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी ज्ञानेश्वरने वेगवेगळ्या चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. शासनाचे धोरण, मुलाला जगण्याचा सल्ला आणि सोबत बँकेच्या कर्जाचे स्टेटमेंटही जोडलेले आहेत. ज्ञानेश्वर हा आठ एकर शेती कसणारा शेतकरी. प्रामाणिकपणे कष्ट करून आयुष्यभर स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न केला. परंतु निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाच्या धोरणाने त्यालाही विषाचा घोट घेणे भाग पडले. आपल्यावर ही वेळ का आली याचा लेखाजोखा त्याने चिठ्ठीत मांडला आहे. ज्ञानेश्वर म्हणतो, ‘माझ्या शेतात संत्र्याची ४०० झाडे होती. २०० झाडे वाळली. मी बेनार आॅफीसला कळविले. नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतातही भेट दिली नाही. मी आयसीआयसीआय बँकेकडे कर्जाची मागणी केली. ते देण्यास तयार झाले. इतर बँकेचे पैसे भरा, नीलचा दाखला आणा, असे सांगितले. माझ्याकडे असलेले ग्रामीण बँकेचे एक लाख आठ हजार रुपये भरले, त्यासाठी १२ टक्के व्याजाने सावरकारी कर्ज घेतले. आयसीआयसीआय बँकेचे तीन लाख ६८ हजार रुपये कर्ज आहे. एडीसीसी बँकेचे ७८ हजार रुपये कर्ज आहे. आतापर्यंत बँकेबरोबर रेग्युलर व्यवहार केल्यामुळे मी कर्जमुक्तीमध्ये बसलो नाही. असे चिठ्ठीत लिहिले आहे.
मुलाला दिला जगण्याचा सल्ला
ज्ञानेश्वर मिसाळ याने आपल्या सतीश व सागर या मुलांच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत जगण्याचा मूलमंत्र दिला. माणूस कितीही मोठा असला तरी पैसा नसेल तर तो कवडीमोल ठरतो. कर्जबाजारी माणसावर कुणी विश्वास ठेवत नाही. माझ्यासोबत जो अनर्थ घडला असा कुणावरही येऊ नये. कोणाचाही पैसा बुडवू नका, व्यवहार चांगले ठेवा, काटकसरीने वागा, आयुष्यात कुणालाही पैसे मागण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सल्ला मुलाला दिला.