शेतकऱ्याचा मुलगा झाला मुख्याधिकारी
By admin | Published: April 9, 2016 02:36 AM2016-04-09T02:36:03+5:302016-04-09T02:36:03+5:30
चोरखोपडी सारख्या खेडेगावात राहून संघर्षशील शेतकऱ्याने आपल्या मुलाला शिकविले आणि मुलानेही कठीण परिश्रम करून त्याचे फलित केले.
परिश्रमाचे फळ : चोरखोपडी येथे आनंद
मुकेश इंगोले दारव्हा
चोरखोपडी सारख्या खेडेगावात राहून संघर्षशील शेतकऱ्याने आपल्या मुलाला शिकविले आणि मुलानेही कठीण परिश्रम करून त्याचे फलित केले.
सध्या दारव्हा येथे वास्तव्यास असलेल्या चोरखोपडी येथील नीलेश गोविंदराव जाधव याची नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य सेवा आयोग परीक्षेच्या निकालात मुख्याधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. त्याने केवळ आपल्या गावचेच नव्हे तर तालुक्याचे नाव मोठे केले आहे. त्याचे वडील गोविंदराव जाधव यांनी अत्यंत मेहनतीने शेतीच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती केली. आज त्यांचा उल्लेख प्रगतीशील शेतकऱ्यांमध्ये केल्या जातो. तीन मुलांमधील नीलेश हा सुरूवातीपासूनच अतिशय परिश्रमी होता. तिसरीपर्यंत तो चोरखोपडी येथेच व त्यानंतर कारंजालाड येथे शिक्षणासाठी गेला. त्याठिकाणी दहावी व बारावी ७५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. डीएडनंतर २००७ मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून त्याची नियुक्ती झाली. परंतु एवढ्यावर समाधान न मानणाऱ्या नीलेशने अत्यंत जिद्दीने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. २०१३ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी त्याची निवड झाली. परंतु तिथे रुजू न होता, तो पुढील ध्येयासाठी परिश्रम करीत राहिला. यानंतर त्याला मुख्य परीक्षेत अपयशाचा सामना करावा लागला. परंतु त्यामुळे खचून न जाता त्याने सातत्यपूर्ण परिश्रम सुरू ठेवले आणि लवकरच त्याची ध्येय प्राप्ती झाली. वडिलांनी निर्णय घेण्यासाठी दिलेले स्वातंत्र, विश्वास यामुळेच हे यश मिळाल्याचे नीलेश सांगतो. ग्रामीण भागात राहुन कोणतेही मोठे शहरातील क्लास न लावता निलेशने मिळविलेले हे यश कौतुकास्पद आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनी न डगमगता सातत्यपूर्ण परिश्रम केल्यास यश निश्चित असल्याचे निलेशने दाखवून दिले. त्याच्या यशाने चोरखोपडीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.