‘मेडिकल’चा बधिरीकरण विभागच ‘बधीर’

By admin | Published: July 11, 2017 01:09 AM2017-07-11T01:09:34+5:302017-07-11T01:09:34+5:30

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बधिरीकरण (अ‍ॅनेस्थेशिया) विभागाचा कारभार पूर्णत: ‘बधीर’ झाला आहे.

'Head of the Medical' section of Badiir | ‘मेडिकल’चा बधिरीकरण विभागच ‘बधीर’

‘मेडिकल’चा बधिरीकरण विभागच ‘बधीर’

Next

भूलतज्ज्ञांचा खासगी सेवेवर जोर : गोरगरीब रुग्णांना ठेवले जाते ‘वेटींग’वर
सुरेंद्र राऊत । लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बधिरीकरण (अ‍ॅनेस्थेशिया) विभागाचा कारभार पूर्णत: ‘बधीर’ झाला आहे. सर्व प्रमुख डॉक्टर खासगीत सेवा देत असल्याने शासकीय रुग्णालयातील रुग्णांना जाणीवपूर्वक वेटींगवर ठेवले जाते. विभाग प्रमुखच मनमानी करीत असल्याने इतर भूलतज्ज्ञाचे चांगलेच फावत आहे.
शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया गृह संपूर्णपणे बधिरीकरण विभागावर अवलंबून आहे. शस्त्रक्रियेसाठी भुलतज्ज्ञांकडून फीट असल्याचा अहवाल आवश्यक असतो. येथील विभाग प्रमुखच प्रशासनाच्या नियंत्रणा बाहेर असून केवळ गप्पांचा फड रंगविणे इतकीच त्यांची उपलब्धी आहे. खासगी रुग्णालयात रात्रपाळी करून आलेले भुलतज्ज्ञ चक्क शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर असताना विश्रांती घेतात. केवळ भुुलतज्ज्ञांच्या मनमानीने वेळेवर शस्त्रक्रिया होत नाही. अपेंडीसच्या रुग्णा अपेंडीस फुटेपर्यंत शस्त्रक्रिया होत नाही.
बधिरीकरण विभागाची कार्यालयीन वेळ ही नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत आहे. यवतमाळात मात्र सोईस्करपणे यात बदल करण्यात आला. येथे सकाळी ९ ते दुपारी १ अशी वेळ करण्यात आली आहे. सकाळी १० वाजताशिवाय येथे कोणी येत नाही आणि दुपारी १२ नंतर खासगी रुग्णालयाच्या घाईने निघून जातात. शस्त्रक्रियेसाठी वॉर्डामध्ये खोळंबेलेल्या रुग्णांशी काहीच सोयरसूतक नाही. बधीरीकरण विभागच्या प्रमुुखाने मागील दहा वर्षात एकाही रुग्णाला ‘अ‍ॅनेस्थेशिया’ दिला नाही. कधी शस्त्रक्रिया गृहाचे कपडेच घातले नाही. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यास या महायशयांची नोकरीच अडचणीत येऊ शकते. केवळ रुग्णालया प्रशासनाची मर्जी असल्याने या प्राध्यापकाचे फावत आहे.

सर्वाधिक डॉक्टर पण उपयोग शून्य
एमसीआयच्या निकषाप्रमाणे बधिरीकरण विभागातील पदे भरली आहे. येथे एक प्राध्यापक, तीन सहयोगी प्राध्यापक आणि चार अधिव्याख्याता आहे. येवढा स्टाफ इतर कोणत्याच विभागात नाही. त्यानंतरही येथील एका सहयोगी प्राध्यापकाने तीन वर्षात अ‍ॅनेस्थेशियाचा ‘भोपळा’ फोडला नाही. स्त्रीरोग शस्त्रक्रिया गृहात न बसता केवळ विभाग प्रमुखांसोबत अवांतर चर्चा करण्यातच त्यांचा वेळ जातो. कार्यालयीन वेळेत खासगी कामे आटोपून दुपारी १ वाजता मेडिकलमध्ये परत येतात. तर दुसरे सहयोगी प्राध्यापक खासगीत सेवा देण्यातच ‘संतोष’ मानतात. त्यांची उपस्थिती एक तासापेक्षा अधिक वेळ कधीच नसते. बरोबर ११ वाजता ते खासगी रुग्णलयातील ड्युटीसाठी निघतात.

‘मेडिकल’मध्ये अनफिट रुग्ण खासगीत फिट
शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी वारंवार अनफिट दाखवून शासकीय रुग्णालयात ताटकळत ठेवले जाते. त्याच रुग्णाला तोच भुुलतज्ज्ञ खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी फिट दाखवतो. यावरून एका भूलतज्ज्ञाला रुग्णाच्या रोषाचाही सामना करावा लागला होता.

Web Title: 'Head of the Medical' section of Badiir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.