मुख्याध्यापिका, चालकावर गुन्हा

By admin | Published: March 13, 2016 03:02 AM2016-03-13T03:02:07+5:302016-03-13T03:02:07+5:30

येथून नांदेपेराकडे जाणाऱ्या मार्गावरील वणी-वरोरा बायपासवर गेल्या १८ फेब्रुवारीला विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या एम.एच.३४-ए.ए.७७३८ या पिक-अप वाहनाचा अपघात झाला होता.

Headmaster, guards on the driver | मुख्याध्यापिका, चालकावर गुन्हा

मुख्याध्यापिका, चालकावर गुन्हा

Next

विद्यार्थी अपघात : विद्यार्थ्यांच्या बयाणानंतर वणी पोलिसांनी केली कारवाई
वणी : येथून नांदेपेराकडे जाणाऱ्या मार्गावरील वणी-वरोरा बायपासवर गेल्या १८ फेब्रुवारीला विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या एम.एच.३४-ए.ए.७७३८ या पिक-अप वाहनाचा अपघात झाला होता. समोरून विरूद्ध दिशेने येणाऱ्या एम.एच.३४-एम.११३३ या कोळशाच्या ट्रकवर विद्यार्थ्यांचे वाहन आदळून चार चिमुरडे ठार झाले होते. या अपघात प्रकरणी मॅक्रून स्टुडंट अ‍ॅकेडमीच्या मुख्याध्यापिका आणि वाहन चालकाविरूद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात गौरव हिरामण देऊळकर वर्ग आठवा, श्रद्धा प्रदीप हुलके, श्रेया रवींद्र उलमाले आणि दिशा राजू काकडे तिघीही वर्ग सातवा, या चार चिमुकल्यांचा बळी गेला. श्रेयस प्रदीप हुलके वर्ग चौथा, श्रृतिका संजय ढोके वर्ग आठवा, हर्षद मनोज इंगोले वर्ग नववा, निशांत यादव देऊळकर वर्ग सातवा आणि वैष्णवी भाऊराव मत्ते वर्ग सहावा हे पाच विद्यार्थी जखमी झाले होते. विशाखा तेलंग किरकोळ जखमी झाली होती. हे सर्व चिमुकले येथील मॅक्रून स्टुडंट अ‍ॅकेडमीचे विद्यार्थी आहेत. या अपघातात पिक-अपचा चालक गणेश गुलाब बोधणे (२३) हासुद्धा गंभीर जखमी झाला होता.
अपघातानंतर वणी शहरासह जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले होते. लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे बैठकांवर बैठकांचे सत्र सुरू झाले. अपघाताला नेमके जबाबदार कोण, याबाबत चर्चा सुरू झाली. अद्यापही बैठका सुरूच आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक, अमरावतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रस्ता बांधकाम विभागाचे अधिकारी आदींनी वणीत येऊन या अपघातामागील कारणे शोधण्याच्या प्रयत्न केला. पोलीस अधीक्षकांनी रस्ता बांंधकाम कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. सुरक्षितता नियमांचे पालन का केले नाही, सूचना फलक का लावले नाही, यावरून त्यांची खरडपट्टी काढली. यानंतर जवळपास सर्वच बैठकांमध्ये नागरिकांनी रस्ता बांधकाम कंपनी, संबंधित वाहन चालक व शाळा चालकांविरूद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रेटली होती.
पोलिसांनी सुरूवातीला याप्रकरणी ट्रक चालक नियाज अहेमद सिद्दीकी (३२) रा.घुग्गुस, (जि.चंद्रपूर) याला ताब्यात घेत त्याच्याविरूद्ध भादंवि ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, १३४, ए.बी.मोटार वाहन कायाद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. अपघातातील जखमी विद्यार्थी भेदरलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांना काही दिवस त्यांचे बयाण घेता आले नव्हते. काही विद्यार्थ्यांवर उपचार सुरू होते. त्यामुळे त्यांचे बयाण नोंदविता आले नव्हते. अखेर त्या वाहनातील सर्व विद्यार्थ्यांचे आता थेट न्यायालयासमोर बयाण नोंदविण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी या अपघाताला पिक-अप वाहन चालक गणेश बोधणे हा सुद्धा कारणीभूत असल्याचे सांगितले. त्यामुळे अखेर या अपघातप्रकरणी आता पोलिसांनी त्याच्याविरूद्ध भादंवि ३०४ (अ), ३०४ पार्ट दोन, २७९, ३३७, ३३८, ए.बी.अ‍ॅक्ट १३४, तसेच मोटार वाहन कायद्याच्या ६६, १९२, २५० (अ) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सोबतच पोलिसांनी मॅक्रून स्टुडंड अ‍ॅकेडमीच्या मुख्याध्यापिका शोभना मेश्राम यांच्याविरूद्धही भादंवि ३०४ (अ), ३०४ पार्ट दोन, २७९, ३३७, ३३८ आणि शाळेत वाहतुकीसाठी योग्य सुविधा नसल्याबद्दल कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

शाळेत वाहतूक निर्देशांचे पालन नाही
या अपघातानंतर सर्वांना विद्यार्थी वाहतुकीचा गहन प्रश्न लक्षात आला. शालेय परिवहन समिती शाळेत गठित झाली किंवा नाही, याची सर्वांना आठवण झाली. पालकमंत्र्यांनी वणीत घेतलेल्या बैठकीत प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी मॅक्रूनमध्ये अशी समिती गठितच झाली नव्हती, अशी माहिती दिली. तसेच सीबीएसई माध्यमाच्या शाळा शिक्षण विभागाला जुमानत नसल्याचेही स्पष्ट केले होते. त्यावर पालकमंत्र्यांनी शिक्षण विभागाने इतर अधिकारांमार्फत अशा शाळांना वठणीवर आणण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात मॅक्रूनने विद्यार्थी वाहतूक निर्देशांचे पालन न केल्याचा ठपका शिक्षण विभागाने ठेवला होता. त्यावर बोट ठेवूनच आता पोलिसांनी मुख्याध्यापिकेविरूद्ध गुन्हा दाखल केल्याने शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Web Title: Headmaster, guards on the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.