खिचडीच्या त्रासातून मुख्याध्यापकांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 06:00 AM2019-12-21T06:00:00+5:302019-12-21T06:00:17+5:30

यवतमाळ नगरपालिकेने ‘सेंट्रल किचन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण आयुक्तांनी यासंदर्भात मार्चमध्येच निर्देश दिले होते. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता नगरपालिकेने निविदा प्रक्रिया राबवून सेंट्रल किचन चालविण्यासाठी बचतगटांना आमंत्रित केले आहे.

Headmaster relieves from Khichadi | खिचडीच्या त्रासातून मुख्याध्यापकांची सुटका

खिचडीच्या त्रासातून मुख्याध्यापकांची सुटका

Next
ठळक मुद्देशाळेऐवजी बाहेर शिजणार अन्न : ‘सेंट्रल किचन’मधून येणार तयार आणि गरमागरम आहार

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शालेय पोषण आहार योजना राबविताना मुख्याध्यापकांची पार कोंडी झाली आहे. मात्र या त्रासातून आता त्यांची लवकरच सुटका होणार आहे. शाळेत अन्न शिजविण्याऐवजी दररोज ‘सेंट्रल किचन’मधून तयार आणि गरमागरम आहार शाळेपर्यंत पोहोचविला जाणार आहे. यवतमाळ नगरपालिकेने त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू केलेली आहे.
पोषण आहारासाठी येणारा तांदूळ साठवून ठेवणे, तो सुरक्षित ठेवणे, धान्यादी मालाची प्रत कायम राखणे, दररोज शिजणाऱ्या अन्नातील घटकांची प्रतिग्रॅमनुसार मोजदाद करणे, अन्न शिजल्यावर त्याची चव तपासणे, त्याची रजिस्टरमध्ये नोंद घेणे, पालकांकडून खात्री करून घेणे, शिजलेल्या खिचडीचे प्रत्येक विद्यार्थ्याला निकषानुसार वाटप करणे, आहार दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची दररोज ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंद करणे, त्यानंतर तांदूळ येण्यास विलंब झाल्यास उधारीत खरेदी करून आणणे, स्वयंपाकी महिलेच्या मानधनाबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करणे अशा अनेक कटकटी मुख्याध्यापकांच्या माथी मारण्यात आल्या आहेत.
मात्र आता हा त्रास किमान शहरी क्षेत्रातील मुख्याध्यापकांना घ्यावा लागणार नाही. यवतमाळ नगरपालिकेने ‘सेंट्रल किचन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण आयुक्तांनी यासंदर्भात मार्चमध्येच निर्देश दिले होते. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता नगरपालिकेने निविदा प्रक्रिया राबवून सेंट्रल किचन चालविण्यासाठी बचतगटांना आमंत्रित केले आहे. त्यानुसार, आठ महिला बचतगटांनी स्वारस्य दाखविले आहे.
आता यातून योग्य गटाची निवड करून त्यांना पुढील सत्रापासून आहार पुरवठ्याचे काम दिले जाईल, अशी माहिती आहे. यवतमाळ नगरपालिकेचा कित्ता गिरवत जिल्ह्यातील इतर नगरपालिका सेंट्रल किचन अमलात आणण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, सेंट्रल किचनचा आदेशच सर्व शहरी शाळांकरिता बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतरही मुख्याध्यापकांना सेंट्रल किचनची आस आहे.

असा निवडला जाईल योग्य गट
शालेय पोषण आहार सेंट्रल किचनमध्ये शिजवून सर्व शाळांना वाटप करण्यासाठी यवतमाळ पालिकेकडे आठ बचतगटांनी प्रस्ताव दिला आहे. आता मुख्याध्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती यापैकी योग्य गटाची निवड करणार आहे. यात प्रशासन अधिकारी योगेश डाफ हे सदस्य सचिव आहेत. तर गटशिक्षणाधिकारी शेषराव राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षलता गायनार, पोषण आहार अधीक्षक सूरज राठोड, महिला व बालविकासचे गोपाल शर्मा, पुरवठा निरीक्षक विजय कदम, अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे हे सदस्य आहेत.

असे होईल आहार वाटप
शहरातील शाळांचे अंतर लक्षात घेऊन अन्न शिजविण्याची योग्य जागा उपलब्ध असलेल्या गटाची निवड होईल. या गटाला अन्न शिजवून अर्ध्याच्या तासाच्या आत सर्व शाळांना तयार अन्न पुरवावे लागणार आहे. त्यामुळे शाळेत दररोज होणाऱ्या स्वयंपाकामुळे पसरणारा धूर, आहार शिजविण्यात वाया जाणारा अध्यापनाचा कालावधी वाचणार आहे.

Web Title: Headmaster relieves from Khichadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा