डेंग्यूच्या शोधार्थ आरोग्य यंत्रणा घरोघरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:03 PM2018-10-24T22:03:30+5:302018-10-24T22:03:53+5:30
गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात डेंग्यूचा प्रचंड उद्रेक झाला असून शेकडो रूग्ण या आजाराने त्रस्त आहेत. ही बाब लक्षात घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाने डेंग्यूशी लढण्यासाठी उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात डेंग्यूचा प्रचंड उद्रेक झाला असून शेकडो रूग्ण या आजाराने त्रस्त आहेत. ही बाब लक्षात घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाने डेंग्यूशी लढण्यासाठी उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे. त्याअनुषंगाने आशा वर्कर, नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी यांच्या मदतीने शहरातील संवेदनशील भागातील प्रत्येक घरी जाऊन त्याठिकाणी असलेल्या पाण्यात डास अळीनाशक औषध सोडले. असे असले तरी अद्याप डेंग्यूचे समूळ उच्चाटन झाले नाही.
दरम्यान, डेंग्यूने वणी शहरात एका १३ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची बाब उजेडात आली आहे. खुशी राकेश बन्सोड असे डेंग्यूने मृत पावलेल्या बालिकेचे नाव असून ती शहरातील एसपीएम शाळेची विद्यार्थिनी होती. गेल्या काही दिवसांपासून ती आजारी होती. वणी शहरातील अनेक डॉक्टरांकडे उपचार केल्यानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला घुग्गूस येथील नातलगांकडे ठेवण्यात आले. नातलगांनी तिच्यावर घुग्गूस येथील एका खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेतले. मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे तिला १४ आॅक्टोबरला चंद्रपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र वाटतेच तिचे निधन झाले. वणी शहरातील डेंग्यूची पहिली बळी ती ठरली.
डेंग्यूला कारणीभूत ठरणारा डास हा स्वच्छ पाण्यात जन्म घेतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा नागरिकांनी ‘ड्राय डे’ पाळावा, ज्या ठिकाणी स्वच्छ पाणी साचून आहे, ते पाणी नष्ट करावे, यातून डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गेल्या अनेक वर्षात वणी भागात डेंग्यूची अशी साथ कधीच पसरली नाही. त्याचबरोबर ग्रामीण भागातही असे रूग्ण आढळून येत नव्हते. मात्र गेल्या एक महिन्यापासून डेंग्यूच्या रूग्णात सातत्याने वाढ होत असल्याने डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. वणीतील खासगी रूग्णालय तर रूग्णांनी तुडूंब भरलेले आहेत.
तपासणी कीटचा पुरवठाच नाही
डेंग्यूचे निदान करण्यासाठी आवश्यक असलेली तपासणी कीट अद्यापही वणी ग्रामीण रूग्णालय अथवा कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरविण्यात आली नाही. त्यामुळे रूग्णांना खासगी पॅथालॉजीमध्ये जाऊन रक्ताची तपासणी करावी लागत आहे. नेमका याचाच फायदा पॅथालॉजीधारक घेत असून शासनाने आकारून दिलेल्या दरापेक्षा अवाच्या सवा पैसे घेऊन रूग्णांची लूट करीत आहे. मात्र यावर आरोग्य यंत्रणेचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.