आरोग्य सभापतींनीच लावले कार्यालयाला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 06:42 PM2021-02-08T18:42:31+5:302021-02-08T18:42:43+5:30
यवतमाळ नगर परिषद : विभाग प्रमुख नसल्याचा संताप
यवतमाळ : नगर परिषदेच्या आरोग्य विभागात सातत्याने सावळागोंधळ कायम आहे. घनकचऱ्याची समस्या तर अजूनही सुटलेली नाही. त्यामुळेच महिनाभरापूर्वीच आरोग्य सभापतीचा पदभार घेतलेल्या साधना काळे यांनी सोमवारी आपला संताप व्यक्त केला. प्रशासन दाद देत नसल्याने आरोग्य विभागाला सभापतींनीच कुलूप लावले.
आरोग्य विभागात पूर्णवेळ विभाग प्रमुखच नाही. विभाग प्रमुखाची संगीतखुर्ची सुरू आहे. कधी कोणाकडे प्रभार आहे, हे माहितच होत नाही. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहे. नव्याने सभापती झालेल्या साधना काळे यांनी पदभार घेताच पूर्णवेळ विभाग प्रमुख द्यावा, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावर एक महिना उलटूनही कोणतीच कारवाई झाली नाही. विभाग प्रमुख नसल्याने आरोग्यची सर्वच कामे खोळंबलेली होती. यामुळेच शहरातील कचराकोंडी वाढत होती. कंत्राटदारांना वेळेत देयके दिली जात नव्हती. याचा परिणाम शहर स्वच्छतेवर होत होता. अशा सर्व कारणांना त्रस्त होऊन आरोग्य सभापतींनी अभिनव आंदोलन केले.
सोमवारी सकाळी १०.३० वाजता त्यांनी कार्यालयाला कुलूप लावले. सभापतींनीच कुलूप लावल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची पंचाईत झाली. ४ वाजता मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात मागण्यांबाबत चर्चा झाल्यानंतर सभापतींनी आरोग्य विभागाचे कुलूप काढले. या आंदोलनामागे वेगळ्या कारणाचीही चर्चा नगर पालिका वर्तूळात सुरू आहे.