लसीकरण, जनजागृतीत आरोग्य विभाग अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:40 AM2021-04-15T04:40:10+5:302021-04-15T04:40:10+5:30
फोटो उमरखेड : तालुका आरोग्य विभाग व पंचायत समिती स्तरावरून तालुक्यात प्रत्येक गावांत कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, ...
फोटो
उमरखेड : तालुका आरोग्य विभाग व पंचायत समिती स्तरावरून तालुक्यात प्रत्येक गावांत कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, मतखंडातील चातारी, विडूळ परिसरातील नागरिकांनी लसीकरणाला स्पष्ट नकार दिला. यामुळे आरोग्य विभाग जनजागृतीत अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले.
तालुक्यात ग्रामीण भागात लसीकरणाचा शुभारंभ विडूळ येथुन सुरु झाला. १३ एप्रिल रोजी गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी चातारी या शेवट टोकावरील गावात लसीकरण सुरु केले. मात्र, खरुस येथे आरोग्य यंत्रणा लसीकरणासाठी पोहोचली असताना या सर्व नागरिकांनी लस घेण्यास नकार दिला. यामुळे यंत्रणा चक्रावून गेली. लसीकरणात अडथळा आला.
खरूस येथे कोणी तरी पाहुणा आला होता. त्याचा अकस्मात मृत्यू झाला. त्यांनी लस टोचून घेतल्यामुळेच मृत्यू झाला, असा गावकऱ्यांचा पक्का समज झाला होता. त्यामुळे गावकऱ्यांनी लसीकरणाला विरोध दर्शविला. खरुस येथे कुणी तरी खोडसाळपणे याबाबत संभ्रम निर्माण केला. शेवटी नागरिकांचे लसीकरण करून त्यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी खुद्द गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांनी उपस्थितांसमोर लस टोचून घेतली. त्यामुळे गावकऱ्यांना लसीची उपयुक्तता पटली. संभ्रमावस्थेतील गावकऱ्यांनी नंतर लस टोचून घेत आपल्या मनात दाटलेला अंधकार दूर केला. परिणामी ५५ नागरिकांचे लसीकरण पार पडले.
ग्रामीण भागात कोरोना आजाराविषयी जनजागृती आणि लस टोचणीबाबत पुरेशी जागृती झाली नसल्याचे यातून दिसून आले. यात आरोग्य विभाग अपयशी ठरला. त्यामुळेच खरुस येथे नागरिक धास्तावून होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कपाळे, परिचारिका, डॉक्टर, विस्तार अधिकारी, तलाठी, सरपंच आदी यावेळी उपस्थित होते.
बॉक्स
अधिक जोमाने जनजागृती करणार
तालुका पातळीवर पंचायत समिती अंतर्गत तालुका आरोग्य विभागाच्या पुढाकारातून नागरिकांना या आजारातून निर्विवाद निरोगीपणे बाहेर काढण्यासाठी व त्यांचे जीवन अधिक निरोगी व कोरोनामुक्त करण्यासाठी लसीकरण सुरू आहे. मात्र, प्रसार व प्रचार कोणत्या पद्धतीने अधिक गतिमान करुन धास्तावलेल्या नागरिकांना गैरसमजातून बाहेर काढण्यासाठी लवकरच प्रसार कार्य राबविणार असल्याचे गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांनी सांगितले.