Coronavirus: कोरोना संशयित इराणी जोडप्याबाबत मुंबईहून यवतमाळला ई-मेल गेला, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 11:14 AM2020-03-07T11:14:31+5:302020-03-07T11:25:30+5:30
दिल्ली विमानतळावर कोरोनाशी संबंधित वैद्यकीय तपासणी सुरू असताना एका इराणी दाम्पत्यानं पळ काढला आणि यवतमाळ गाठलं
यवतमाळ: इराणवरून आलेल्या एका मुस्लीम दाम्पत्याने दिल्ली विमानतळावरील कोरोना रुग्णांच्या तपासणी केंद्राबाहेरून पळ काढत यवतमाळ, नांदेड गाठल्याचा मेल मुंबईच्या आरोग्य खात्याकडून यवतमाळात धडकला. यामुळे येथील आरोग्य यंत्रणेची प्रचंड धावपळ झाली. या रुग्णांचा यवतमाळ व नांदेड जिल्ह्यात शोधही घेतला गेला.
यवतमाळच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमती तरंगतुषार वारे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या संगणकात मुंबईच्या आरोग्य विभागातून एक मेल धडकला. इराणहून दिल्लीला आलेला सर्फराज आणि त्याची पत्नी विमानतळावर कोरोनाच्या अनुषंगाने उभारण्यात आलेल्या तपासणी केंद्रातून पळाल्याची माहिती होती. हे दाम्पत्य तपासणीपूर्वीच पळाल्याने ते कोरोना बाधीत असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. हे जोडपे यवतमाळात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यांचा मोबाईल क्रमांकही मेलमध्ये नमूद होता.
प्राथमिक तपासणी केली असता इराणी दाम्पत्य माहूर येथे एका दर्ग्यावर दर्शनासाठी गेले व तेथून पुन्हा इराणला परत गेल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. या अनुषंगाने यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून इराणच्या त्या दाम्पत्याचा ठावठिकाणा मिळवण्याचा प्रयत्न केला. मेलमध्ये नमूद मोबाईल क्रमांकावर प्रशासनाने संपर्क केला असता रिंग वाजली. मात्र कॉल रिसीव्ह झाला नसल्याचे डॉ. वारे यांनी सांगितले.
सदर दाम्पत्य आता नेमके कुठे आहे, ते कोरोना बाधीत आहे का, मेलमध्ये दिलेला मोबाईल क्रमांक त्यांचाच आहे का, ते इराणला परत गेले का, यवतमाळ-नांदेडमध्ये त्यांचे कोणी नातेवाईक राहतात का, असे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. परंतु नागपूर, मुंबई, नांदेडसह सर्वच विमानतळावर या दाम्पत्याबाबत माहिती देण्यात आली असून सतर्क करण्यात आले आहे. अचानक आलेल्या या ईमेलने यवतमाळच्या आरोग्य व जिल्हा प्रशासनाची मात्र चांगलीच धावाधाव झाली.