आरोग्य सैनिक निघाले तापाशी लढायला
By admin | Published: November 4, 2014 10:47 PM2014-11-04T22:47:53+5:302014-11-04T22:47:53+5:30
डेंग्यू, मलेरिया, चंडिपुरा, चिकन गुण्या, व्हायरल फिवर आदी प्रकारच्या तापाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. या तापाशी दोन हात करण्यासाठी आरोग्य विभागाचे सैनिक सज्ज झाले आहेत.
यवतमाळ : डेंग्यू, मलेरिया, चंडिपुरा, चिकन गुण्या, व्हायरल फिवर आदी प्रकारच्या तापाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. या तापाशी दोन हात करण्यासाठी आरोग्य विभागाचे सैनिक सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात या विभागाकडून ताप उद्रेक नियंत्रण धडक मोहीम राबविली जात आहे. गावोगावी मोहीम राबविली जात असल्याने या सैनिकांना ताप नियंत्रणात येईल, असा विश्वास आहे.
गावातील उकिरडे, सांड पाण्याच्या तुंबलेल्या नाल्या, जागोजागी तयार झालेली गटारं यामुळे तापाचा उद्रेक वाढला आहे. पावसाळा संपून महिनाभराचा कालावधी लोटल्यानंतरही ग्रामपंचायती किंवा आरोग्य विभागाने तुंबलेल्या नाल्या स्वच्छ करण्याविषयी पावले उचलली नाही. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला. गावागावात विविध प्रकारच्या तापाचे रुग्ण वाढत आहे. यात डेंग्यूसदृश आजाराचेही रुग्ण आहेत. रुग्णांमुळे शासकीय आणि खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल होत आहे. आता डासांवर नियंत्रण हाच एक प्रभावी उपाय असल्याने आरोग्य विभागाने गाव रोगराईमुक्त करण्यासाठी अभियान सुरू केले आहे.
यासाठी पथक निर्माण करण्यात आली. आरोग्य सैनिक गावोगावी जावून टेमीफॉसचा वापर, रक्त नमुने घेणे, नाले-गटारे साफ ठेवणे, घरोघरी स्वच्छता या बाबत जागृती करत आहेत. उकिरडे गावापासून दूर असावे असा सल्ला दिला जात आहे. कित्येक वर्षांपासून गावालगतचे उकिरडे दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून उपाययोजना होत नाही. शिवाय आरोग्य विभागालाही याविषयी कुठलेही सोयरसुतक नव्हते. आता मात्र हा विभाग खडबडून जागा झाला आहे. गावागावात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही केले जात आहे. (वार्ताहर)