कोरोना योद्ध्यांच्या पगाराला ‘आरोग्य’च्या पेपरफुटीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 02:21 PM2022-01-03T14:21:33+5:302022-01-03T14:36:49+5:30
आरोग्य विभागाच्या पदभरतीचा पेपर फुटल्यानंतर आरोग्य अभियानाचा सहसचिव महेश बोटले याला अटक झाली. मात्र या प्रकरणाने आरोग्य अभियानातील कोरोनाकाळात जादा मेहनत घेणाऱ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या पगाराला फटका बसला.
यवतमाळ : आरोग्य विभागाच्या पदभरतीचा पेपर फुटल्यानंतर आरोग्य अभियानाचा सहसचिव महेश बोटले याला अटक झाली. मात्र या प्रकरणाने आरोग्य अभियानातील कोरोनाकाळात जादा मेहनत घेणाऱ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या पगाराला फटका बसला. त्यामुळे व्यक्ती केंद्रित कारभारामुळे आरोग्य अभियानच दिवाळखोरीला निघाल्याचा आरोप त्रस्त कर्मचाऱ्यांनी केला आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. मात्र रिक्त पदांची भरती करण्याकडे आरोग्य विभागाने अनेक दिवस कानाडोळा केल्यानंतर कशीबशी पदभरतीची परीक्षा घेतली. त्यातही तारखा आणि तांत्रिक चुका झाल्यामुळे ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याचीही नामुष्की ओढवली. त्यानंतर झालेल्या परीक्षेचाही पेपर फुटला. गंभीर म्हणजे पेपरफुटीच्या या प्रकरणात सूत्रधार म्हणून आरोग्य अभियानाचा सहसचिव महेश बोटलेच कारागृहात गेला.
या दरम्यानच्या काळात अपुरे मनुष्यबळ असतानाही काम करीत असलेल्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. शासनाने जाहीर केलेला कोविड भत्ताही दिला नाही. आरोग्यवर्धिनीचा मेहनताना मिळाला नाही. आरोग्य विभागाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची अनेक देयके प्रलंबित आहे. सहसचिव महेश बोटले व विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी असलेले अभियानाचे लेखाधिकारी यांच्यात टक्केवारीची सेटिंग असल्यामुळे पगाराच्या बाबतीत विलंब लागत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे यांनी केला आहे.
आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना शासनाने नेमून दिलेले आरोग्य विषयक ९५ कार्यक्रम राबवावे लागतात. गेल्या दीड वर्षांपासून या ९५ कार्यक्रमांसह कोविड लसीकरणाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर येऊन पडली. अभियानातील ७० टक्के पदे रिक्त असताना नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांना वेठबिगार पद्धतीने राबवून घेतले जात आहे, असाही आरोप जयसिंगपुरे यांनी केला.
मंगल कार्यालयांचे भाडेही थकविले
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत प्रशासनाने अनेक ठिकाणचे मंगल कार्यालय नागरिकांना क्वारंटाइन ठेवण्यासाठी वापरले. मात्र अनेक महिने लोटल्यानंतरही या मंगल कार्यालयांना भाडेच देण्यात आलेले नाही, असा आरोप अशोक जयसिंगपुरे यांनी केला. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येत असल्याची शक्यता आरोग्य विभागच वर्तवित आहे, तर दुसरीकडे आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना कोण आणि कसा करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.