आरोग्य सेवा कोलमडली

By admin | Published: July 23, 2014 11:50 PM2014-07-23T23:50:45+5:302014-07-23T23:50:45+5:30

ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा पोहोचाव्या, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली़ मात्र तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अप-डाऊननुसार सुरू आहे़

Health service collapses | आरोग्य सेवा कोलमडली

आरोग्य सेवा कोलमडली

Next

डॉक्टरांचे अप-डाऊन : बोगस डॉक्टरांना मिळते चालना, ग्रामस्थ झाले त्रस्त
मारेगाव : ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा पोहोचाव्या, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली़ मात्र तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अप-डाऊननुसार सुरू आहे़ त्यामुळे रूग्णांची हेळसांड होत असून या संधीचा लाभ बोगस डॉक्टर घेत आहे़
ग्रामीण जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रातून ग्रामीण जनतेला सेवा दिली जाते. ग्रामीण जनतेसाठी मारेगाव तालुक्यात वेगाव, मार्डी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आले. नवरगाव येथे आयुर्वेदिक दवाखाना, तर रोहपट येथे फिरते रूग्णालय स्थापन करण्यात आले. म्हैसदोडका येथे भरारी पथकही आहे. याशिवाय १५ गावांमध्ये आरोग्य उपकेंद्रे आहे़ परंतु या सर्व आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचा कारभार मनमानी सुरू आहे़
या केंद्र व उपकेंद्रातील डॉक्टर मंडळी बाहेरगावावरून अप-डाऊन करतात. त्यामुळे रूग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही़ ग्रामस्थांना शेवटी तालुका ठिकाणाची वाट धरावी लागते. तोपर्यंत एखादी गंभीर रूग्ण दगावण्याची शक्यता निर्माण होते. गावात डॉक्टर राहात नसल्याने या संधीचा लाभ वैद्यकीय क्षेत्राचे थोडेफार ज्ञान असलेल्या लोकांनी घेतला आहे. किंबहुना आरोग्य केंद्रातील डाक्टरांनीच त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली, असे म्हटल्यास अतिशोयक्ती ठरणार नाही. यामुळे जनतेच्या आरोग्याची सर्वत्र हेळसांड सुरू आहे़
या संदर्भात बरेचदा ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या़ परंतु त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही़ आरोग्य कर्मचाऱ्यांचे दूरपर्यंत मजबूत नेटवर्क असल्यामुळे ग्रामस्थांना आता तक्रार करावी तरी कुणाकडे, असा प्रश्न पडला आहे़ वैद्यकीय अधिकारी अप-डाऊन करीत असल्याने गावपातळीवरील परिचारीकाही गावात राहात नाही़ कधीतरी एखादेवेळी त्या गावाला भेट देतात़ नागरिकांना न भेटता अंगणवाडी सेविकेची भेट घेऊन, माहिती संकलन करून त्या निघूनही जातात़
गरोदर माता, लहान बाळ यांच्या आरोग्याबद्दल कसल्याही सूचना ग्रामीण महिलांना मिळत नाही़ त्यामुळे संगोपनाकडे दुर्लक्ष होते़ आता पावसाळ्याला सुरूवात झाली आहे़ अनेक आजार जोर पकडत आहे़ परंतु ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याबद्दल कोणत्याही सूचना मिळत नाही़ दूषित पाण्याच्या स्त्रोतात ब्लिचिंग पावडर टाकली जात नाही़ अशावेळी एखादा रूग्ण दगावला, तर या डॉक्टरवर कारवाई होण्याची गरज आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे तालुक्यात उडालेले धिंडवडे बघता रूग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी डॉक्टरांनी मुख्यालयी राहण्याची गरज आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा ग्रामीण भागातील जनतेला तालुका ठिकाणी जाण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Health service collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.