आरोग्यसेवा वाऱ्यावर

By admin | Published: November 25, 2015 06:41 AM2015-11-25T06:41:18+5:302015-11-25T06:41:18+5:30

तालुक्याची आरोग्यसेवा कमालीची कोलमडली आहे. नागरिकांना उपचारासाठी तालुका किंवा शहर गाठावे लागते.

Health service wind | आरोग्यसेवा वाऱ्यावर

आरोग्यसेवा वाऱ्यावर

Next

घाटंजी : तालुक्याची आरोग्यसेवा कमालीची कोलमडली आहे. नागरिकांना उपचारासाठी तालुका किंवा शहर गाठावे लागते. गंभीर रुग्णांना तर थेट रेफर केले जाते. या बाबीकडे जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. परिणामी गरीब आणि गरजू लोकांना मानसिक त्रासासोबतच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
रुग्णांना गावापासून जवळच किंवा गावातच उपचार मिळावे, यासाठी बहुतांश ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आरोग्य पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणामुळे नागरिकांना आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. बहुतांश ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. अधिकारीच कामात हयगय करत असल्याने कर्मचाऱ्यांचेही चांगलेच फावत आहे. या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाने केंद्र परिसरातच निवासस्थाने उभारली आहे. परंतु त्याचा उपयोग किती अधिकारी आणि कर्मचारी घेतात, हा संशोधनाचा विषय आहे. बहुतांश अधिकारी, कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणावरून सेवा बजावतात.
अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक त्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. परंतु त्याचा लाभ रुग्णांना दिला जात नाही. खाटा आणि गाद्यांची व्यवस्थित देखभाल होत नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. बेडवरील चादरी नियमित स्वच्छ केल्या जात नाहीत. या प्रकारामुळे संसर्गजन्य आजाराचीही भीती आहे. आजारातून मुक्त होण्याऐवजी नवीन आजार जडण्याचाही धोका आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमधील आरोग्यसेवा कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर दिली जाते. बहुतांश ठिकाणी तर परिचारिकांच्या भरवशावर केंद्र सोडून दिले जाते. वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती अपवादानेच राहाते. तालुक्याचा बहुतांश भाग जंगलव्याप्त आहे. अनेक भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशावेळी अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळण्याची सोय तालुक्याच्या रुग्णालयांमध्ये नाही. प्राथमिक उपचार करताच रुग्ण हलविण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.
सर्दी, खोकला, ताप यासारख्या रुग्णांनाही इतरत्र हलविण्याचे सांगितले जाते. त्यामुळे या आरोग्य केंद्रांचा उपयोग काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे तालुक्याच्या ग्रामीण आरोग्य सेवेची दैना मांडण्यात आली आहे. मात्र कुणीही ही बाब गांभीर्याने घेतली नाही. लोकांच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष सुरू आहे. लोकप्रतिनिधीसुद्धा याविषयी गंभीर नाही. त्यामुळे दर्जेदार आरोग्यसेवेसाठी कुणाकडे धाव घ्यावी, हा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात चांगली सेवा मिळत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे नागरिकांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावून उपचार घ्यावे लागते. या प्रकारात त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Health service wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.