वणी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा तोकडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:37 PM2018-11-21T22:37:10+5:302018-11-21T22:37:34+5:30
वणी तालुक्याची लोकसंख्या अडीच लाखाहून अधिक झाली. ४० वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येनुसार तालुक्यात एक ग्रामीण रूग्णालय व चार प्राथमिक आरोग्य केंद्र एवढी शासकीय आरोग्य यंत्रणा होती. मात्र ४० वर्षानंतरही यात किंचीतही वाढ झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी तालुक्याची लोकसंख्या अडीच लाखाहून अधिक झाली. ४० वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येनुसार तालुक्यात एक ग्रामीण रूग्णालय व चार प्राथमिक आरोग्य केंद्र एवढी शासकीय आरोग्य यंत्रणा होती. मात्र ४० वर्षानंतरही यात किंचीतही वाढ झाली नाही. त्यामुळे तालुक्यात शासकीय आरोग्य यंत्रणा तोकडी असल्याने ती कुचकामी ठरत आहे. परिणामी नागरिकांचा या आरोग्य यंत्रणेवर विश्वास राहिला नसल्याने शहर व ग्रामीण भागातील खासगी रूग्णालये रूग्णांनी हाऊसफुल्ल दिसत आहे.
तालुक्यात वणी येथे ग्रामीण रूग्णालय व राजूर, शिरपूर, कायर व कोलगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. घोन्सा व तेजापूर येथे आरोग्य उपकेंद्र आहेत. मात्र ५० हजारांच्यामागे एक शासकीय रूग्णालय अथवा केंद्र असल्याने ही यंत्रणा तोकडी ठरत आहे. तसेच शासकीय रूग्णालयामध्ये आवश्यकतेनुसार डॉक्टरही उपलब्ध नसल्याने कित्येकदा रूग्णालयातील परिचारिका, आरोग्य सहाय्यकांनाच थातुरमातूर उपचार करून रूग्णांची बोळवण करावी लागते. शासनाने रूग्णालयांना वाहने, औषधी साठ्याची कमतरता ठेवली नाही. मात्र त्याचा वापर करण्यासाठी पुरेसी यंत्रणा नाही. त्यामुळे शासकीय रूग्णालये केवळ रेफर करणारी केंद्रे बनली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना ३०-४० किलोमीटर अंतरावरची गावे जोडली गेली आहेत. त्यामुळे रूग्णांना जाण्या-येण्याचा खर्च करण्यापेक्षा गावातच खासगी डॉक्टरांकडून उपचार करवून घेणे लाभदायक ठरते. आत्ताच्या लोकसंख्येनुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तीन ते चार डॉक्टरांची गरज आहे. मात्र काही आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरसुद्धा उपलब्ध नाही. डॉक्टरांच्या सभा, गाव भेटीसाठी एक डॉक्टर सतत फिरता असतो. त्यामुळे कधी-कधी ओपीडी काढण्यासाठी आरोग्य केंद्रात डॉक्टर नसतो. कोलगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र, तर तालुक्याच्या अंतिम टोकावर असल्याने केवळ नावापुरतेच आहे. हे केंद्र शिंदोला येथे असणे जनतेसाठी हितावह आहे. मात्र त्याचा विचार शासन स्तरावर होताना दिसत नाही. शासकीय आरोग्य यंत्रणेला सार्वजनिक आरोग्य, लसीकरण, शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक असते. मात्र ही कामे होताना दिसतच नाही. त्यामुळे ग्रामीण भागात कधी-कधी साथीचे आजार रौद्र रूप धारण करतात आणि मग आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू होते.
शिरपूरचे शवविच्छेदन गृह लाखो रूपये खर्च करूनही निरूपयोगी ठरत आहे. चारही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय निर्माण केले गेले. तथापि या कार्यालयाचाही ग्रामीण रूग्णांना काहीच लाभ होताना दिसत नाही.
वणीच्या ग्रामीण रूग्णालयात सुविधांचा अभाव
वणी येथील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्याचा प्रश्न अजूनही शासन दरबारी रेंगाळत आहे. यासाठी मात्र अद्यापही उपाययोजना करण्यात आली नाही. या ग्रामीण रूग्णालयातील विविध अत्याधुनिक यंत्रे बंद अवस्थेत असल्याचे दिसून येते. परिणामी रूग्ण मात्र उपचारासाठी खासगी रूग्णालयाकडे धाव घेताना दिसते.