कमिशनच्या वाट्यासाठी हृदयविकाराचे नाट्य !
By Admin | Published: August 8, 2014 12:12 AM2014-08-08T00:12:52+5:302014-08-08T00:12:52+5:30
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या येथील नेहरू स्टेडियमच्या प्रांगणात ३१२ सौर पथदिवे लावण्यात आले. याची कुठलीही निविदा न काढता आणि तांत्रिक कामे करण्याचे अधिकार नसताना
यवतमाळ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या येथील नेहरू स्टेडियमच्या प्रांगणात ३१२ सौर पथदिवे लावण्यात आले. याची कुठलीही निविदा न काढता आणि तांत्रिक कामे करण्याचे अधिकार नसताना तज्ञाविनाच काम पूर्ण केले. यात ६४ लाख ५३ हजार ७२० रुपयांचे चढ्या दराने देयक काढून हे काम करण्यात आले. एवढच नाही तर जास्त पैसा खर्च होण्यासाठी सेंट्रलाईज सोलर युनीटलाही बगल देण्यात आली. विशेष असे की, वरिष्ठ अधिकाऱ्याला कमीशनचा वाटा द्यावा लागू नये म्हणून चक्क एका अधिकाऱ्याने हृदयविकाराचे कारण पुढे करून तो रुग्णालयात दाखल झाला.
शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हा प्रशासनाच्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये आणि परिसरात सौर पथदिवे लावण्यात आले. येथील नेहरू स्टेडियममधील प्रांगणातही ३१२ सौर पथदिवे लावण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक खंडारे यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाला काही अटी आणि शर्ती ठेऊन मंजूरात देण्यात आली. मात्र जास्त पैसा खर्च करून कमीशन मिळावे यासाठी सेंट्रलाईज सिस्टीम लावण्या ऐवजी प्रांगणात सौर पथदिवे लावण्यात आले.
कार्यालयाच्या छतावर पॅनल लावून एखाद्या खोलीत बॅटरी ठेवल्या असत्या तर त्यांची सुरक्षा राहिली असती. ईमारतीवरील उष्णता शोषली जाऊन भुमिगत केबलव्दारे उर्जा पुरवठा सुलभ झाला असता. सौर पथदिव्यांच्या तुलनेत सेंट्रलाईज युनीट स्वस्त पडले असते. मात्र एका पुढाऱ्याला खुश करण्यासाठी आणि लाखोंच्या कमिशनचा वाटा मिळण्यासाठी पथदिव्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. कंत्राटदार कंपनीने हे काम पूर्ण केल्यानंतर देयके काढण्यातही धिसाडघाई करण्यात आली.
ही बाब कंत्राट देणाऱ्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठाला कळताच तो यवतमाळात दाखल झाला. संबंधित अधिकाऱ्यालाही तो कमिशनसाठी येणार असल्याची कुणकुण लागली. कमिशनचा वाटा द्यावा लागू नये म्हणून कंत्राट देणारा अधिकारी हृदयविकाराचे कारण पुढे करून थेट एक खासगी रुग्णालयात दाखल झाला. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यानेही त्याच्यावर बदलीचे हत्यार उपसले. त्यामुळे भितीतून या अधिकाऱ्याने रुग्णालयातून सुटी घेतली.
तसेच लगबगीने कार्यालय गाठून वरिष्ठाला कमिशनचा वाटा दिल्याचे खुद्द क्रीडा कार्यालयातूनच सांगण्यात आले. यापूर्वी असाच घोटाळा चंद्रपूर येथे झाला आहे. त्याचीच ही पुनर्रावृत्ती असल्याचे बोलल्या जाते.
यासंदर्भात अमरावतीचे क्रीडा उपसंचालक जयप्रकाश ढुबळे आणि यवतमाळचे जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक खंडारे यांच्या मोबाईलवर संपर्क केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)