पुसद तालुक्यात दमदार पाऊस
By admin | Published: July 9, 2014 11:54 PM2014-07-09T23:54:32+5:302014-07-09T23:54:32+5:30
पुसद शहरासह परिसरात मंगळवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला होता. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला निसर्गाची कृपा झाली
पुसद : पुसद शहरासह परिसरात मंगळवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला होता. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला निसर्गाची कृपा झाली आणि पिकांना जीवदान मिळाले. दमदार पावसाने बळीराजा सुखावला आहे.
मृगानंतर आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता. मात्र बळीराजा पुनर्वसू नक्षत्राने संकटातून बाहेर काढले आहे. मंगळवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पुसद शहरासह परिसरात दमदार पाऊस झाला. दोन तास चांगला नंतर रात्री ९ वाजेपर्यंत रिमझिम पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी झाला. एक महिना पावसाची वाट पाहावी लागली. पेरण्या पूर्णत: खोळंबल्या होत्या. अखेर पंढरपूरचा विठोबा बळीराजाच्या मदतीला धावून आला. मंगळवारी सायंकाळी दोन तास दमदार पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहून जात होते. विशेषत: सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ झाल्याचे दिसून आले. मात्र या पावसाने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. शहरात रात्री
पुसद शहरासह शेलू, चिल्लवाडी, पोखरी, वरुड, आरेगाव, सावंगी, निंबी, पार्डी, बोरी, बोरगडी, मांडवा, सांडवा, शेंबाळपिंपरी, कार्ला, माणिकडोह, धुंदी, काटखेडा, हर्षी, शिळोणा, नंदपूर, मोहा आदी भागातही चांगला पाऊस झाला. गतवर्षी जेथे जून महिन्यात १४ जून रोजी पूस धरण ओव्हरफ्लो झाले होते. तर जून महिन्यात ३५० मि.मी.पावसाची नोंद झाली होती. यावर्षी ९ जुलैपर्यंत ३२ मि.मी. एवढाच पाऊस झाला आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याचा पहिला आठवडासुद्धा कोरडा गेल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ग्रामीण भागात पेरणीची कामे खोळंबली होती. परंतु आता पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)