पुसद तालुक्यात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:49 PM2018-06-23T22:49:22+5:302018-06-23T22:49:58+5:30
गत दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शुक्रवारी रात्री दमदार आगमन झाले. मध्यरात्री १२.३० वाजतापासून ४.३० वाजेपर्यंत पुसद शहरासह तालुक्यात धुव्वाधार पाऊस कोसळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : गत दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शुक्रवारी रात्री दमदार आगमन झाले. मध्यरात्री १२.३० वाजतापासून ४.३० वाजेपर्यंत पुसद शहरासह तालुक्यात धुव्वाधार पाऊस कोसळला. चार तास बरसलेल्या पावसाने शेतकरी सुखावला असून पुसद शहराची जीवनदायिनी पूस नदी दुथडी भरून वाहात आहे, तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणात ३३ टक्के जलसाठा झाला आहे.
मृगनक्षत्राच्या सुरुवातीला पुसद तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर १० जूनपासून पावसाने दडी मारली. पेरणी झालेले शेतकरी धास्तावले. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. अनेकांचे पेरलेले बियाणे अंकुरून जळू लागले होते. या प्रकाराने शेतकरी बेचैन झाले होते. अशातच हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आणि शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास धुव्वाधार पावसाने हजेरी लावली. वारा शांत असल्याने जलधारांनी वेग घेत काही वेळातच संपूर्ण शहरात पाणीच पाणी झाले. पूस नदी ओसंडून वाहू लागली. यंदा पूस नदीचे खोलीकरण व रुंदीकरण झाल्याने निर्मळ पूस वाहताना पाहून पुसदकरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. पाऊस आणखी थोडा झाला असता तर पूस नदीच्या पुलावरून वाहू लागले असते. भिलवाडीचा पूल, हत्ती पुलावरून पाणी वाहात होते. तालुक्यातील चोंढी, बान्सी, सावंगी, वनवार्ला, वालतूर रेल्वे, वरूड, सांडवा, मांडवा, बोरी या भागात नदी नाल्यांना पूर आला. अनेकांच्या शेतात पाणी शिरले.
पुसद शहरात रात्रभरात ४६ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत २८० मिमी पाऊस तालुक्यात पडला आहे. पूस धरणात ३३ टक्के जलसाठा झाला आहे. पूस नदीला पहिला पूर आला असून येत्या १५ दिवसात पुसदकरांना नियमित पाणीपुरवठा होईल, असे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी दिली. रात्रीच्या पावसाने चोंढी येथील माजी आमदार विजय पाटील चोंढीकर यांच्या शेतातील हळद पीक वाहून गेले. नदीकाठावरील अनेक शेतात पाणी शिरल्याने बियाणे वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र या पावसाचा फायदा नळयोजनेसह गावातील विहिरींच्या पाणीपातळी वाढण्यात झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
शेतकरी सुखावले
दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाल्याने पुसद तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पसरले होते. मात्र शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने शेतकºयांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. या पावसाने पेरणी उलटण्याची भीती नाहिशी झाली असून निघालेल्या बियाण्यांना पोषक होणार आहे.