पुसद शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
By admin | Published: June 13, 2014 12:36 AM2014-06-13T00:36:07+5:302014-06-13T00:36:07+5:30
शहरासह परिसरात गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळाच्या तडाख्यात विजेचे खांब जमिनदोस्त झाले. वृक्ष उन्मळून पडल्याने अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक बंद झाली होती.
पुसद : शहरासह परिसरात गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळाच्या तडाख्यात विजेचे खांब जमिनदोस्त झाले. वृक्ष उन्मळून पडल्याने अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक बंद झाली होती. पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांवर पाणी तुंबले होते. यातून नगरपरिषदेने केलेले पावसाळ्यापूर्वीचे नियोजन पार कोलमडल्याचे दिसून आले.
शहरातील नाले व गटारांची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता न केल्यामुळे सायंकाळी झालेल्या पावसात घाण पाणी साचले होते. येथील ग्रेन मार्केटसमोर गुडघ्यापर्यंत पाणी तुंबले होते. जीवाची काहिली करणाऱ्या उकाड्यामुळे सर्वांनाच जोरदार पावसाची आस लागली होती. रोहिणी नक्षत्र पूर्णत: कोरडे गेल्याने सर्वच जण उकाड्याने हैराण होते. सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वादळाला सुरुवात झाली.
यात घरांची छपरे, मोठमोठाले वृक्ष, विजेचे खांब उन्मळून पडले. छप्पर उडाल्याने अनेकांचे संसारोपयोगी साहित्य पावसात भिजले. पहिल्या पावसातच नगरपरिषदेच्या स्वच्छतेचे पितळ उघडे पडले. एकंदर या पावसामुळे समाधान व्यक्त होत असले तरी हानी झाल्याने अनेकांच्या चिंतेत भर पाडली आहे. शहरातील वीज पुरवठा पूर्णत: ठप्प झाला होता. त्यात दुरुस्तीच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. (लोकमत चमू)