अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; घोषणा कोट्यवधींच्या निधीची अन् मदत तुटपुंजी
By रूपेश उत्तरवार | Published: November 2, 2022 03:51 PM2022-11-02T15:51:53+5:302022-11-02T15:54:43+5:30
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले
यवतमाळ : राज्यभरात अतिवृष्टीने २३ लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली. या स्थितीत मदतीचा हात म्हणून राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांच्या नैसर्गिक आपत्ती निधीची घोषणा केली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काही हजार रुपयेच पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या जखमा अधिकच मोठ्या झाल्या आहेत. नुकसानभरपाई निघेल कशी? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.
राज्यातील २३ लाख हेक्टरपैकी दहा लाख हेक्टर क्षेत्र विदर्भातील आहे. त्यात पाच लाख हेक्टर क्षेत्र एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील आहे. या ठिकाणी पावणेपाच लाख शेतकऱ्यांना मदतीसाठी ६४३ कोटी वळते झाले आहेत. किमान एका शेतकऱ्याला ४० हजार रुपये मिळतील, अशा स्वरूपाचे चित्र सरकारकडून रंगविण्यात आले. प्रत्यक्षात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत हातात पडली. यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
प्रारंभी तलाठी, पटवारी आणि कृषी सहायकांनी याद्या तयार करताना विलंब लावला. यानंतर बँकांची आडकाठी आली. दिवाळीनंतर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. त्यातही अनेक शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या अनेक गावांमध्ये लागलेल्या नाहीत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत निधी देताना त्यांच्या खात्यावर पाच हजार, सात हजार, नऊ हजार, १२ हजार अशी रक्कम गोळा झाली आहे. वास्तविक पाहता, प्रत्येक शेतकऱ्याला लाख रुपयांच्या वर फटका बसला. हातात पडलेल्या रकमेत शेतातील मोठे गवतही काढणे अवघड आहे.
दुपटीने निधी वाढविला, मदत मात्र घटविली
राज्य शासनाने हेक्टरी मर्यादा ६८०० वरून १३ हजार ६०० केली आहे. मात्र, नुकसानीचे सर्वेक्षण करताना यंत्रणेकडून शेतकऱ्यांना ३० टक्के, ४० टक्के, ६० टक्के, ७० टक्के यानुसार घोषित मदतीच्या रक्कम मिळाली आहे. ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला पाच हजारांपासून ते २५-३० हजारांपर्यंत आहे. मदतीचा आकडा पाच अंकी असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फारच कमी आहे. यामुळे झालेली नुकसान भरपाईही भरून निघणार नाही, अशी स्थिती आहे.
सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे. आमच्या शेतात लाख रुपयांपेक्षाही अधिक नुकसान आहे. प्रत्यक्षात चार हजार रुपयांची मदत खात्यात जमा झाली आहे.
- हरीश लढ्ढा, शेतकरी, बोरीअरब
आमच्या शेतात नैसर्गिक आपत्तीसोबतच रानडुकरांनी देखील आठ एकरचे पीक भुईसपाट केले आहे. अशा परिस्थितीत घर कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाची ही मदत ताेकडी आहे.
- राजेश तिवाडी, शेतकरी, उजोणा
माझ्या शेतात आजही चालता येत नाही इतका चिखल आहे. या परिस्थितीत मला नुकसानभरपाई १२ हजार मिळाली आहे. या पैशात काय होणार? या ठिकाणी माझे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
- अनुप चव्हाण, शेतकरी, बोथबोडन