जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 05:00 AM2022-07-14T05:00:00+5:302022-07-14T05:00:15+5:30
रात्रीही पावसाचा जोर कायम राहिल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पात मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने बेंबळासह सायखेडा आणि अधरपूस प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बेंबळा प्रकल्पात बुधवारी सकाळी ४६.५२ टक्के पाणीसाठा होता.या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून ५० घनसेमीने पाणी सोडण्यात येत आहे. तर सायखेडा प्रकल्प १०० टक्के भरला असून या प्रकल्पातून ६९.३८ घनसेमीने पाणी सोडण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मंगळवारी दिवसभर अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळल्यानंतर मध्यरात्री पावसाने आणखी जोर धरला. हा पाऊस पहाटेपर्यंत सर्वदूर कोसळत होता. यंदा प्रथमच संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून २४ तासांत तब्बल ६९.७ मिमी पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे शंभरपैकी ५५ मंडळांत अतिवृष्टी नोंदवली गेली आहे.
यवतमाळ तालुक्यात सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत ४७.८ मिमी पाऊस झाला आहे. बाभूळगाव ५१.३, कळंब ५१.२, दारव्हा ६३.३, दिग्रस ५४.२, आर्णी ७५.४, नेर ४७.२, पुसद ६५.५, उमरखेड १३२.३, घाटंजी ४०.१, राळेगाव ६३.५, महागाव १०९.१, वणी ७८.६, मारेगाव ४९.२, केळापूर ८६.७ तर झरी जामणी तालुक्यात सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत तब्बल १०५.५ मिमी इतका विक्रमी पाऊस झाला आहे.
बेंबळासह सायखेडा, अधरपूसमधूनही पाण्याचा विसर्ग
- यवतमाळ : सहा दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. मंगळवारीही जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर रात्रीही पावसाचा जोर कायम राहिल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पात मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने बेंबळासह सायखेडा आणि अधरपूस प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बेंबळा प्रकल्पात बुधवारी सकाळी ४६.५२ टक्के पाणीसाठा होता.या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून ५० घनसेमीने पाणी सोडण्यात येत आहे. तर सायखेडा प्रकल्प १०० टक्के भरला असून या प्रकल्पातून ६९.३८ घनसेमीने पाणी सोडण्यात येत आहे. अधरपूस प्रकल्पात ५९.५९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून ५० घनसेमीने पाणी सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
प्रकल्प परिसरातही पावसाचा जोर
- मागील सहा दिवसांतील पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प साठ्यात वेगाने वाढ होत आहे. विशेषत: प्रकल्प परिसरात पावसाचा चांगला जोर दिसून येत आहे. पूस प्रकल्प परिसरात आजवर २३७ मिमी पाऊस झाला असून तेथे दररोज साधारण ६५ मिमी पावसाची नोंद होत आहे. तर अरुणावती प्रकल्प परिसरात आजपर्यंत २३० मिमी पाऊस झाला असून तेथे दररोज ४० मिमी पाऊस नोंदविला जात आहे. बेंबळा प्रकल्पातही आजवर २४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गोखी प्रकल्प परिसरात आजवर २१८ मिमी पाऊस झाला असून तेथे दररोज साधारण ४० मिमी पाऊस पडत आहे. अधरपूस प्रकल्प परिसरात आजवर १५८ मिमी पावसाची नोंद असून मागील पाच दिवसांत तेथे साधारण दररोज ४३ मिमी पाऊस नोंदविला जात आहे. तर नवरगाव प्रकल्प परिसरात सर्वाधिक ५०३ मिमी पाऊस बुधवारपर्यंत झाला असून तेथे दररोज ७० मिमी पाऊस होत असल्याने हा प्रकल्पही तुडुंब होण्याच्या मार्गावर आहे.
दराटी, पिरंजी व तरोडा लघु प्रकल्प तुुडुंंब
- पाटबंधारे उपविभाग क्र. ४ महागाव यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी ३ वाजता दराटी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. तर सायंकाळी ७ वाजता पिरंजी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. तरोडा प्रकल्पही शंभर टक्के भरला असून या तीनही प्रकल्पातून सांडवा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुधवारी दराटी लघु प्रकल्पातून १५ सेमीने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. तर पिरंजीमधून १० आणि तरोडा प्रकल्पातून ५ सेमीने सांडवा विसर्ग सुरू होता.