यवतमाळ जिल्ह्यात धो धो.. दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी; आर्णी तालुक्यात विक्रमी १०५ मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 04:40 PM2022-07-12T16:40:27+5:302022-07-12T16:47:48+5:30
मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले आहे.
विशाल सोनटक्के
यवतमाळ : सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यात जोरदार पाऊस कायम आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३५.७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर आर्णी तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले असून या तालुक्यात २४ तासांमध्ये १०५ मि.मी. एवढा विक्रमी पाऊस नाेंदविला गेला आहे. मंगळवारीही पावसाचा जाेर कायम असून पावसामुळे काही भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यातही पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य हवालदिल झाले होते. मात्र, मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले आहे.
मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत यवतमाळ तालुक्यात २१.२, बाभूळगाव १०.९, कळंब २१.६, दारव्हा १९.४, दिग्रस ४३.७, आर्णी १०५.५, नेर २२.६, पुसद १६.५, उमरखेड २५.५, महागाव ४०, वणी ५४.३, मारेगाव १९.६, झरीजामणी ५५.२, केळापूर ४४.२, घाटंजी ५७, तर राळेगाव तालुक्यात २५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी पहाटे पुन्हा पावसाचा जोर सुरू होता. दुपारी १२ पर्यंत अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत होता. त्यानंतरही दिवसभर अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती.
या दहा मंडळात झाली अतिवृष्टी
- कलगाव (ता.दिग्रस) ८०.०० मि.मी.
- आर्णी (ता.आर्णी) १३७.०० मि.मी.
- जवळा (ता.आर्णी) १३७.०० मि.मी.
- लोणबेहळ (ता.आर्णी) १०६.८ मि.मी.
- सावळीसदोबा (ता.आर्णी) ८६.०० मि.मी.
- बोरगाव (ता.आर्णी) ८०.३ मि.मी.
- अंजनखेड (ता.आर्णी) ८६.०० मि.मी.
- घाटंजी (ता.घाटंजी) ८८.०० मि.मी.
- साखरा (ता.घाटंजी) ६५.०० मि.मी.
- पारवा (ता.घाटंजी) ६५.०० मि.मी.