यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे थैमान; पाच तालुक्यात अतिवृष्टी, पुराच्या पाण्यात मुलगा वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 11:59 AM2022-07-18T11:59:33+5:302022-07-18T12:06:15+5:30
सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६१.२ मिमी पाऊस झाला असून यवतमाळसह पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
यवतमाळ : रविवारी रात्री ८ वाजता सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत सुरूच असल्याने यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांपुढे पुराचा धोका निर्माण झाला आहे. बाभूळगावात अनेक ठिकाणी पूरपस्थिती असून तेथील मस्जीद परिरसातील नदी काठची घरी पाण्याने वेढली आहे. तालुक्यातील किन्ही व गोंधळी या गावांनाही पुराचा वेढा पडला असून धामणगाव रस्त्यावरील सिद्धेश्वर मंदिर पाण्याखाली गेल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर, यवतमाळमध्ये कॉलनीत आलेला पूर पहायला गेलेला एक मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला. दरम्यान सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६१.२ मिमी पाऊस झाला असून यवतमाळसह पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
रविवारी सायंकाळपासून यवतमाळसह जिल्ह्यात रिमझीम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस अधूनमधून सुरू असतानाच रात्री १० नंतर पावसाने जोर पकडला. सोमवारी सकाळी ११.३० पर्यंत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरुच होता. बाभूळगाव शहरालगतच्या उंच पुलावरून पुराचे पाणी वाहत असून बाभूळगाव येथील मस्जीद परिसरातील नदी काठची घरे पुराने वेढली आहे. बाभूळगावातील गोरक्षणातील गाईच्या गोठाही पुराच्या पाण्यात सापडला आहे.
राळेगाव तालुक्यातील रामतीर्थ येथील वर्धा नदीवर बांधलेल्या पुलावरूनही पाणी वाहू लागले आहे. अपर वर्धा प्रकल्पाचे सर्व १३ दरवाजे पहाटे ५ वाजता १५० सेमीने उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने बाभूळगावसह कळंब, राळेगाव, मारेगाव आणि वणी तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राळेगाव तालुक्यातील अनेक गावे पुराने वेढली अूसन सावनेर येथील दहा घरे पुरामध्ये वाहून गेली. झाडगावसह सावंगीसमोर पुराचा धोका असून तालुक्यातील चहांद आणि करंजी गावांचा संपर्क तुटला आहे. पिंपळगावातील काही घरात पाणी शिरले असून वडकी, फुटाणे ले-आऊटमध्येही पूरस्थिती आहे. मध्यम प्रकल्पाच्या पाण्यामुळे वरुड जहांगीर येथील बंजारा वस्तीत पाणी शिरले आहे.
राळेगावमध्ये १४७ तर कळंबमध्ये १३० मिमी पाऊस
रविवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात राळेगाव तालुक्यात १४७.९ मिमी पाऊस झाला आहे. कळंब तालुक्यालाही पावसाने झोडपले असून येथे १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. बाभूळगाव तालुक्यात १०३.४ मिमी, नेर १०३.१ मिमी तर यवतमाळ तालुक्यात ७० मिमी पाऊस झाला असून सोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम असल्याची स्थिती आहे.
उपकेंद्र पाण्यात; राळेगाव तालुक्यातील १६ गावे अंधारात
राळेगाव तालुक्यात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून झाडगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रात पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील डीसी पुरवठा थांबविण्यात आला असून सर्व ३३ केव्ही व ११ केव्ही फिडरवरून होणारा वीज पुरवठाही थांबविण्यात आला आहे. सदर उपकेंद्रातून १६ गावांना वीज पुरवठा केला जातो. ही १६ ही गावे सध्या अंधारात असून पूरस्थिती ओसरल्यानंतर नुकसानीची माहिती घेवूनच विद्युत पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे राळेगावच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.
वरुड, जहांगीर तांड्यावरील नागरिकांनी गाठली टेकडी
रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वरुड, जहांगीर येथील तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठा वाढला आहे. तलाव ओव्हर फ्लो होवून नुकसान होण्याच्या भीतीने वरुड, जहांगीर तांड्यातील नागरिकांनी घराला कुलूपे ठोकून वरच्या बाजूला असलेल्या टेकडीचा आसरा घेतला आहे. पुराच्या भीतीमुळे लेकरां-बाळांसह ही कुटुंबे पहाटेपासून उपाशीच टेकडीवर बसून असल्याचे वार्ताहरांनी कळविले आहे.
कॉलनीत आलेला पूर पाहताना मुलगा वाहून गेला
यवतमाळ शहरातील मुलकी परिसरात मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर आला. पूर बघण्यासाठी जय गायकवाड (रा. मुंगसाजी नगर वडगाव आर्णी रोड) हा मित्रांसोबत गेला, सकाळी नाल्यात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला.