यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, नदी-नाल्यांना पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 11:09 AM2022-07-06T11:09:42+5:302022-07-06T11:12:42+5:30
यवतमाळ व गोंदिया जिल्ह्याच्या विविध भागांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
यवतमाळ / गोंदिया : यवतमाळ व गोंदिया जिल्ह्याच्या विविध भागांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यात सर्वाधिक ५४.३ मिमी पाऊस झाला असून, सर्वात कमी ४.५ मिमी पाऊस उमरखेडमध्ये नोंदविला आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ९ लाख ५८ हजार हेक्टर आहे. त्यातील ३ लाख ३८ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या होत्या. मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे या पेरण्यांना आता वेग आला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी
गोंदिया जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८१ मिमी पावसाची नोंद झाली असून, गोंदिया, तिरोडा, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव या चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तिरोडा आणि सडक अर्जुनी तालुक्यात झालेल्या पावसामुळे या तालुक्यातील काही मार्ग बंद झाले होते.
सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी - खोडशिवणी मार्गावरील पूल वाहून गेल्याने या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. तर बाम्हणी-दल्ली मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्गसुद्धा बंद झाला होता. चूलबंद नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठालगत असलेल्या गावांना याचा फटका बसला होता. जिल्ह्यात सर्वाधिक १५० मिमी पावसाची नोंद सडक अर्जुनी तर त्या पाठोपाठ १४० मिमी पावसाची नोंद तिरोडा तालुक्यात वेढ झाली होती.
दमदार पावसामुळे तिरोडा शहरातील काही वस्त्यांना पाण्याचा वेढा घातल्याचे चित्र होते. जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे.
पुरात वाहून गेलेल्याचा मृतदेह सापडला
गडचिरोली जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने छोट्या नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यातच सोमवारी आरमोरी तालुक्यातील वसा येथे कोलांडी नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेलेला एक इसम वाहून गेला होता. मंगळवारी त्याचा मृतदेह सापडला. राजकुमार एकनाथ राऊत (वय ३८) असे त्या मृताचे नाव आहे. गडचिरोलीच्या ४ तालुक्यांत तिवृष्टीची नोंद झाली.
वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस आर्वी तालुक्यात
जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील सहा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. आर्वी येथे १७४.४ मि.मि., वाठोडा येथे १११ मि.मि., वाढोणा येथे १०३ मि.मि., विरूळ येथे १२८.३ मि.मि., रोहणा येथे १५४ मि.मि. तर खरांगणा येथे ६८.४ मि.मि. पाऊस रविवार झाला. जिल्ह्यात १४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची अतिवृष्टी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आर्वी तालुक्यात कुठेही जिवितहानी झाली नसली तरी ३५ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. आठ गोठे पडले आहे. वाठोडा, देऊळवाडा सांझातील ११० कुटूंबांच्या घरात पाणी घुसले होते. या पुरग्रस्त भागाला उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदारांनी भेट दिली. नदीकाठावरील १ हजार हेक्टर पिकाचे नुकसान आर्वी तालुक्यात झालेले आहे. जिल्ह्यातील सेलू, वर्धा, देवळी, आर्वी या तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. आर्वी तालुक्यातील ५४ गावातील २६५ कुटूंब बाधित झाले तर देवळी तालुक्यात २ गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. देवळी तालुक्यात तसेच आर्वी तालुक्यात अनेक ठिकाणी लहान पूल तसेच पुलालगतचा भराव वाहून गेल्याने वाहतुकही बंद पडली आहे.