राळेगाव येथे जोरदार अवकाळी पाऊस; वीज पडून गुराखी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 06:27 PM2021-04-08T18:27:52+5:302021-04-08T18:28:10+5:30
या पावसाने ज्वारीचे कणसे काळी पडण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे . यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
यवतमाळ : जिल्ह्यात अनेक तालुक्यात ढगाळी वातावरण आहे .दुपारी राळेगाव आणि परिसरात काही ठिकाणी विजेचा कडकडाट व जोरदार पाऊस पडला. राळेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सध्या शेतात ज्वारी, तीळ, टरबूज या पिकांना फटका बसला आहे. या अवकाळी पावसाचा फटका सर्वात जास्त भुईमूंग आणि आंब्याला बसणार आहे .
या पावसाने ज्वारीचे कणसे काळी पडण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे . यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णता हतबल झाले. अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं जीव टांगणीला लागला आहे. खरीप हंगामात पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला. त्यात रब्बी आणि उन्हाळी पिकांवर त्यांची भिस्त होती. ती अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणाने हिरावली. आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. बदलत्या हवामानाने हवेत गारवा पसरल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. परंतु याच हवामानाने संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती सुद्धा आहे .
राळेगाव येथे वीज पडून गुराखी ठार
तालुक्यात गुरुवारी दुपारी अवकाळी वादळी पाऊस झाला. त्यातच अंगावर वीज कोसळल्याने १५ वर्षीय गुराखी युवक मृत्यूमुखी पडला. शेवन शंकर पवार (१५) रा.वडजई असे मृत युवकाचे नाव आहे. तो राळेगाव येथील एचपी जिनिंगच्या मागील बाजूला बकऱ्या चारण्यासाठी गेला असताना दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसातच त्याच्या अंगावर वीज कोसळली. यात त्याचा मृत्यू झाला. महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच धाव घेतली. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.