पुसद तालुक्यात भीषण पाणीटंचाई
By admin | Published: May 5, 2017 02:14 AM2017-05-05T02:14:22+5:302017-05-05T02:14:22+5:30
संपूर्ण राज्याला जलक्रांतीचा संदेश देणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांचा पुसद तालुका अद्यापही टॅँकरमुक्त होऊ शकला नाही.
सहा गावांसाठी टॅँकरचा प्रस्ताव : २० गावांसाठी विहीर अधिग्रहण
प्रकाश लामणे पुसद
संपूर्ण राज्याला जलक्रांतीचा संदेश देणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांचा पुसद तालुका अद्यापही टॅँकरमुक्त होऊ शकला नाही. उन्हाळ््याला सुरूवात होताच माळपठारासह गावागावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी सहा गावांना टॅँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. तर २० गावात खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहे. तब्बल ७३ लाख ३० हजार रुपयांचा कृती आरखडा मंजूर केला असला तरी उपाययोजना मात्र शून्य आहे.
पुसद शहराने राज्याला दोन मुख्यमंत्री दिलेले आहेत. इसापूर आणि पूस धरण या तालुक्यात आहे. मात्र त्यानंतरही दरवर्षी या तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यंदा म्हैसमाळ, अनसिंग, गौळ मांजरी, उल्हासवाडी, उपनवाडी, बाळवाडी या सहा गावांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. विशेष नळ दुरूस्तीमध्ये पन्हाळा, मारवाडी खु., हिवळणी तलाव, मोख, आमटी, पिंपळगाव ईजारा, फेट्रा, लोहरा इजारा, जवळा, सावरगाव बंगला, फुलवाडी, म्हैसमाळ, इनापूर, माळ आसोली, शिवानगर, रामनगर, माणिकडोह, कारला, आरेगाव खु. आदी १९ गावांसाठी तब्बल ७३ लाख ३० हजार रुपयांचा कृती आराखडा मंजूर केला आहे.
तालुक्यातील म्हैसमाळ, रोहडा, मांजर जवळा, गोपवाडी, चिंचघाट, लोभीवंतनगर, बान्सी, ज्योतीनगर, जमनीधुंदी, धनसिंगनगर, बजरंग नगर, लक्ष्मीनगर, चिरंगवाडी, पाथरवाडी, हर्षी, मोखखाड, कुंभारी, बेलोरा बु., नंदपूर आदी २० गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित आहे. माळपठार भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावागावांतील नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाही कुचकामी ठरली असून, नळातूर अपुरे पाणी तेही आठवड्यातून एकदा येत आहे. प्रशासनाने तयार केलेल्या कृती आराखड्यातील उपाययोजनांना अद्यापही प्रारंभ झाला नाही. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. पाणीटंचाईच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी
होत आहे.