‘हेचि दान देगा देवा’ हे तुकोबांचे पसायदान
By admin | Published: April 6, 2017 12:37 AM2017-04-06T00:37:15+5:302017-04-06T00:37:15+5:30
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान सर्वांना सुप्रसिद्ध आहे. भक्त शिरोमणी संत नामदेव, संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी
उद्धवबुवा जावळेकर : गजानन महाराज मंदिरात रामजन्मोत्सव
पुसद : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान सर्वांना सुप्रसिद्ध आहे. भक्त शिरोमणी संत नामदेव, संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी यांनी परमेश्वराकडे जे मागणं मागितलं आहे ते पसायदानच आहे. भागवत धर्म मंदिराचा कळस ठरलेले जगत्गुरू तुकोबा यांचे ‘हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा’, हेही पसायदानच असल्याचे प्रतिपादन कीर्तनकार उद्धवबुवा जावळेकर यांनी येथे केले.
गजानन महाराज मंदिरातील रामजन्म उत्सवातील कीर्तनपुष्प गुंफतांना ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणहून पाठविलेले जडजवाहीर, मेना, उंची वस्त्रे, पालखी अत्यंत निरिच्छपणे तुकोबांनी नम्रपणे परत केली. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवलेल्या पेशवाईतील न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूणे यांनीदेखील श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या पत्नी रमाबाई यांनी दिलेली उंची वस्त्रे, दागदागिने परत करून आपल्या नि:स्पृहतेचा परिचय करून दिला, असे ते म्हणाले.
सुरुवातीला संस्थानचे सचिव भालचंद्र जिलावार यांनी जावळेकरबुवांचे स्वागत केले. संस्थानचे अध्यक्ष राधेश्याम जांगीड यांनी शरदचंद्र देशपांडे, संजय कोरटकर, कार्यकारिणी सदस्य केशव पवार यांनी प्रा.डॉ.चंद्रकिरण घाटे व सहकलावंत गजानन गवळी यांचा सत्कार केला. संचालन संस्थानचे उपाध्यक्ष प्रा.अरुण तगडपल्लेवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)